Jump to content

पान:पायवाट (Payvat).pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

रंगवणे किंवा धार्मिक बुवाबाजीची आवश्यकता प्रतिपादन करणे, याचे महत्त्व त्यांना अधिक वाटले. वरचा समाज एकेक सुधारणा वरून लादीत होता, या वस्तुस्थितीबरोबर सामाजिक गुलामीत गढलेले कनिष्टवर्गीय स्तरही उसळून वर येण्याचा प्रयत्न करीत होते, या दुसऱ्या वस्तुस्थितीकडे केतकरांचे लक्ष जाऊ शकले नाही. मुळात त्यांच्यासमोर प्रत्येक समाजसुधारणा हा एक सामाजिक प्रयोग होता. या प्रयोगाचा असमाजशास्त्रीय पायाच त्यांना दिसला. समाजशास्त्रीय पायावर त्यांच्याच भोवताली घडणाऱ्या सत्यशोधक समाजाचे किंवा दलित फेडरशेनचे कार्य अवलोकन करणे त्यांना महत्त्वाचे वाटले नाही. डॉ. केतकरांचा प्रयत्न कलादृष्ट्या किती यशस्वी झाला हा मुद्दा बाजूला ठेवला, तर सामाजिक प्रक्षोभ मुखरित करण्यासाठी लागणारी वैचारिक बंडखोरी इथे बीजरूपाने दिसते हे मान्य केले पाहिजे.
 आणि एकीकडे हा सगळा वाङ्मयीन विचार करीत असताना दुसरीकडे दुसराही विचार आपल्यासमोर असला पाहिजे. ज्या सामाजिक प्रक्षोभाचे वर्णन आणि चित्रण आपण अपेक्षीत आहोत, त्या क्षोभाचे अस्तित्व प्रत्यक्ष जीवनात किती प्रमाणात आहे ? अगदी पददलित असणारा अस्पृश्य समाज घेतला, तरी त्याच्या राजकारणाची धडपड सोयी आणि सवलती पदरात पाडून वेण्यापुरतीच सीमित झालेली दिसते. वरिष्ठ वर्गीयांना जे जीवन उपलब्ध झालेले आहे, तसे जीवन आपल्याला उपलब्ध व्हावे यासाठी हा प्रयत्न आहे. आणि मिळणाऱ्या सोयी आणि सवलती पुरेशा नाहीत, या दिशेनेच हा प्रयत्न सतत जात असतो. या सामाजिक पुनरुत्थानाच्या चळवळीला वैचारिक बंडखोरीचे अधिष्ठान देण्याचा प्रयत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काही प्रमाणात १९२४ ते १९३० या कालखंडात केलेला होता. या मनोवृत्तीतूनच बहिष्कृत भारतातील त्यांचे लिखाण उदयाला आलेले आहे. पण ही वैचारिक बंडखोरी तीस सालानंतर फारशी दिसत नाही. राजकारणाच्या पवित्र्यात-प्रतिपवित्र्यात वैचारिक मोहीम मागे पडलेली दिसते.आणि त्यांच्या कार्याचा शेवट एका धर्माच्या निष्ठा सोडून दुसऱ्या धर्माच्या निष्ठा स्वीकारण्यात झालेला दिसतो. हिंदू धर्माला जसे भव्य व उदात्त तत्त्वज्ञान आहे, तसा गलिच्छ व घाणेरडा आचारमार्गाचा इतिहासही आहे. प्रत्येकच धर्माला असा इतिहास असतो. बौद्धांच्या धार्मिक आचारांचा इतिहास आपण वगळू शकतो व तथागताचे नारदर्शन स्वीकारू शकतो, या जिद्दीतून बाबासाहेबांचे धोरण निर्माण झालेले दिसते. शेवटी नव्या धर्मनिष्टा स्वीकारून वैचारिक बंडखोरी कशी करता येणार ? भारतात नवे सामाजिक थर उसळून वर येत आहेत. पण त्यांच्या धडपडीला मूल्यान्तरीकरण करणाऱ्या वैचारिक बंडखोरीचे अधिष्ठान नाही. सुधारणावादासाठी असणाऱ्या समन्वजा चौकटी सांभाळीतच ही धडपड चालते. तिचे चित्रण सामाजिक प्रक्षोभ म्हणून कसे करायचे हाही एक प्रश्न आहे. अशा वेळी सामाजिक प्रक्षोभाचे दर्शन घडविणारा ललित लेखक अधिक मोठ्या ताकदीचा असणे आवश्यक असते.

 तेराव्या शतकात मराठी वाङ्मयाचा आरंभ झाला, त्या वेळेपासून हे वाङ्मय

आजचे मराठी साहित्य सामाजिकदृष्ट्या पुरेसे प्रक्षोभक आहे काय ? ९५