ज्याप्रमाणे ग्रामीण निसर्गाच्या मखरात बसविलेली नागरकथाच आहे, तसाच प्रकार या वाङ्मयाचा होऊ घातला आहे. दलित समाजाच्या व बहुजनसमाजाच्या जीवनाचे चित्रण ज्या पातळीवरून प्रा. माटे यांनी केलेले होते, त्याच्यापुढे खरातही जाऊ शकत नाहीत अशी वस्तुस्थिती आहे. आणि ही पातळी दर्शनाची पातळी आहे. जनतेच्या विविध थरांतून लेखक पुढे आले म्हणजे वाङ्मयाचा एकदेशीपणा समाप्त होईल, ही आशा सफल होण्याची फारशी चिन्हे अजून दिसत नाहीत. बहुजनसमाजातील लेखक उदयाला येतात व वाहाणी वाङ्मयाची मूल्ये स्वीकारून त्यांच्याच जातीगोतीचे वाङ्मय लिहू लागतात. लिहिणारा माणूस समाजाच्या कोणत्या थरातील, व्यवसायातील आहे, तो कोणत्या जातीचा आहे, याचा वाङ्मयावर, वाङ्मयाच्या स्वरूपावर फार परिणाम होत नसतो, तर या माणसातील लेखक कोणत्या वाङ्मयीन निष्ठांना जाणता-अजाणता शरण जातो याचा वाङ्मयावर परिणाम होतो. जनतेतून लेखक वर येतात आणि वाङ्मयाच्या चालू कसोट्या, पद्धती, संकेत पाळू लागतात, मळलेल्या चाकोरीतून जाऊ लागतात. त्यांमधून नव्या facts गोळा होण्याचाही फारसा संभव नसतो. जीवनाचे अजून न घडलेले चित्रण होण्याचाही संभव फार कमी.
हरिभाऊ आणि वामन मल्हार सुधारणावादाच्या काही प्रश्नांच्याभोवती किंवा तात्त्विक प्रश्नांच्याभोवती आपल्या वाङ्मयाची उभारणी करीत होते. ती करताना थोडेफार समाजाचे चित्रण त्यांच्या वाङ्मयात होत होते. पण या चित्रणाचे स्वरूप दर्शनाचे होते. समाजाच्या अंतरंगात शिरून निरूपण करण्याचे त्यांचे प्रयोजन नव्हते. पुढच्या काळातील फड़के, खांडेकर, माडखोलकर, कवठेकर ही पिढी कोणत्याच जीवनाचे चित्रण करीत नव्हती. ब्राह्मणी लेखक असले म्हणजे ते ब्राह्मणी जीवनाचे चित्रण करतातच, असा काही नियम नाही. जीवनाच्या प्रवाहातूनच हे लेखन वर उचलले गेलेले होते. प्रत्येकाच्या मनात कथानकाचे, शैलीचे काही संकेत गृहीत धरलेले होते. वाचकवर्गाला आपण आकर्षक कसे वाटू, याविषयी प्रत्येकाची निराळी धडपड होती. प्रत्येकाजवळ स्वतःचा कलाशून्य स्वप्नाळूपणा होता. या स्वप्नाळूपणाबरोबरच वास्तवतेपासून योजने दूर असणाऱ्या राजकारणाचे संकेत होते. पढिक वैचारिक आग्रह होते. समाजाने व सरकारने लादलेली बंधने मोइन फेकणे व त्यांविरुद्ध बंड करणे तुलनेने सोपे असते. त्या मानाने स्वतःच्याच मनाने स्वीकारलेल्या चौकटी मोडणे फार कठीण असते. स्वतःभोवती उभ्या केलेल्या स्वप्नाळूपणाच्या पिंजऱ्यातून बाहेर येण्याचे काम सोपे नव्हते. ते या पिढीला जमलेच नाही. सुधारणावादाच्या व स्वप्नाळूपणाच्या मर्यादा ओलांडून समाजाच्या अंतरंगात शिरण्याचा व अंतःप्रवाहाची छाननी करण्याचा प्रयत्न मराठी कादंबरीत फक्त एकदाच झाला होता व तो डॉ. केतकरांनी केला होता. त्यामुळे केतकरांच्या कादंबरीत काही ठिकाणी सामाजिक क्षेत्राचे धागेदोरे वावरत असताना दिसतात. पण केतकरांचे प्रमुख लक्ष पाश्चात्य सुधारणावादाचे अनुकरण करणाऱ्या वरिष्ठवर्गीय समाजसुधारकांचा असमाजशास्त्रीय दृष्टिकोण व उथळपणा दाखवून देण्यावर होते. परदेशातील समाज