पान:पायवाट (Payvat).pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्त्री-शूद्रांना उद्देशन लिहिले गेलेले आहे. या वाङ्मयाच्या निर्मात्यांनी जी जीवनदृष्टी पुरस्कारिली, ती सर्वागीण क्रांतीची नव्हती. तसा सर्वांगीण क्रांतीचा योग भारताच्या इतिहासात आलाच नाही. आमची सारी भूमिका समन्वयवादाचीच राहिली. पण धर्मजीवनातील अनेक स्थित्यंतरे पाहिलेला हिंदुधर्म जसा या बाबीला अपवाद नाही, तसा बौद्धधर्मही याला अपवाद नव्हता. धर्म ही कधीच केवळ व्यक्तींच्या विचारांची गोळाबेरीज नसते. ती एक सामाजिक प्रक्रिया आहे. तिच्यात समाजातले नानाविध थर आपापले इहलौकिक जीवन सांभाळून भाग घेत असतात. या इहलौकिक जीवनाचा भाग काही प्रमाणात धर्म बदलून देत असतो. त्यापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात या जीवनाच्या अंगावर शोभिवंत दिसतील या बेताने धर्माचे अंगरखे वेतून घेतले जातात.
 भगवान तथागताने ज्या जीवनविषयक भूमिकेचा पुरस्कार केला ती जीवनदृष्टी कोणती, हा प्रश्न वादाचा आहे कारण याबाबत त्रिपीटकातील कोणते ग्रंथ प्रमाण मानावेत व त्यांची संगती कशी लावावी, येथून वाद सुरू होत असतो. धर्मनेते म्हटले की त्यांचे आग्रही अनुयायी असतातच. ते जुन्या धर्मसिद्धांताला नवी स्पष्टीकरणे देतात. चैतन्यमय ब्रह्म हे जगाचे अभिन्न निमित्त, उपादानकारण आहे, हा वेदान्त नव्या अणुविज्ञानाच्या परिभाषेत स्पष्ट करण्याचा मोह जसा हिंदूंना आवरणे कठीण, त्याचप्रमाणे तथागताचा उपदेश सर्व समाजासाठी हितबुद्धीने कर्म करा असा होता हे सांगण्याचा मोह बौद्ध विचारवंतांना आवरणे कठीण. पण बौद्ध धर्म म्हणजे केवळ तथागताचे विचार नव्हते. तथागताच्या अनुयायांनी जी एक सार्वजनिक चळवळ निर्माण केली, ती चळवळ म्हणजे बौद्ध धर्म. ज्या धर्माने इसवी सनापूर्वी ३०० पासून इसवी सन ६०० पर्यंत भारताचे वैचारिक नेतृत्व केले, आणि तक्षशिला व नालंदा विद्यापीठांतून ज्ञानाचे नवे ओघ वाहविले, त्याचे स्वरूपही असेच समन्वयवादी होते. वारकऱ्यांचा विठोबा बाजूला सारला आणि त्याऐवजी मोक्षदाता शरण्य भगवान म्हणून तथागताचा स्वीकार केला म्हणजे देवता बदलतात. शरण जाण्याची प्रवृत्ती बदलत नसते. जीवनदृष्टी बदलत नसते. हिंदूंचा ब्राहाणी कर्मविपाकाचा सिद्धान्त त्याज्य म्हणून सोडला व बौद्ध श्रमणांचे शून्यवादी माध्यमिक सौत्रान्तिक किंवा वैभाषिक सिद्धान्त घेतले, म्हणजे जो बदल होतो तो मूलभूत नसतो.

 बौद्धांच्या आणि शंकराचार्याच्या भूमिका इतक्या जवळजवळ होत्या की शंकराचार्यानासुद्धा म्हणावेसे वाटले, 'तुम्ही अलयविज्ञान शाश्वत माना म्हणजे आमचा तुमचा फारसा काही विरोध राहत नाही.' वेदान्ती असणाऱ्या मध्वाचार्यांसारख्या हिंदूंनी तर शंकराचार्योना प्रच्छन्न बौद्धच म्हटले आहे. इतक्या या भूमिका जवळजवळ होत्या. अशावेळी जो बदल होत असतो, तो मूलभूत असूच शकत नाही. स्वतःला सर्व वर्णोत श्रेष्ठ मानणारी व परमेश्वराच्या मुखापासून उत्पन्न झाल्याचा अभिमान मिरवणारी ब्राहाणजात बाजूला सारली व त्याऐवजी तसेच सदृश अहंकार मनातल्या मनात जोपासणारी मराठा जमात आली, म्हणजे श्रेष्ठ जातीचे फक्त अनुक्रम बदलतात. वैश्य गुप्त हे क्षत्रिय

९६ पायवाट