प्रासादिक गद्य देवलांच्याजवळ आरंभापासून होते असे समजणे चुकीचे आहे. १८८६ पासून १८९९ पर्यंत म्हणजे 'शारदा' नाटक लिहीपर्यंत देवलांना मराठी रंगभूमीवर पहिल्या तेरा वर्षांत फारसे यश मिळवता आले नाही. ही कटू असली तरी वस्तुस्थिती आहे. 'सौभद्रा'शी स्पर्धा करता येईल अशी लोकप्रियता तर सोडाच, पण नव्याने पुढे येणाऱ्या खाडिलकर-कोल्हटकरांची प्रतिष्ठा व लोकप्रियताही त्या कालखंडात देवलांना मिळाली नाही.
एकदम डोळे दिपवणारी अशी देवलांची नाट्यसृष्टी नाही. ती क्रमाने अंतःकरण काबीज करून मनात रुजणारी व अढळ राहणारी अशी पण प्रकृतीने सौग्य अशी नाट्यसृष्टी आहे. कोल्हटकरांप्रमाणे देवल चटकन स्वतःकडे आकर्षित करून घेणाऱ्या नाविन्याने नटलेले नव्हते. आणि नावीन्य ओसरल्यानंतर कोल्हटकरांच्याप्रमाणे प्रायोगिक रंगभूमीवरून त्यांचा अस्तही झाला नाही. या कालखंडात देवल स्फुट गद्य लिखाणही करीत होते. त्यांनी मराठीत भाषांतरासाठी निवडलेली कादंबरी रेनाल्ड्सची होती. त्यांना संस्कृतमध्ये आकर्षण वाटले असेल, तर ते कालिदास, शूद्रक आणि बाणभट्टाचे होते. यांत शूद्रकालाच काही प्रमाणात आपण वास्तववादी नाटककार म्हणू शकतो. त्या वास्तववादाच्या खाणाखुणा देवलांच्या अनुवादात पुसट झालेल्या आहेत.
मराठीतील सामाजिक नाटकांचे प्रणेते म्हणून देवलांना ओळखले जाते ते 'शारदेमुळे. 'शारदा' हे प्रभावी ठरलेले व सामाजिक आशय असणारे मराठी रंगभूमीवरील पहिलेच नाटक होते. आणि देवलांचेही पहिलेच स्वतंत्र वाङ्मयीन अपत्य तेच होते. याचा अर्थ यापूर्वी हा प्रयोग कुणी केला नव्हता असा मात्र करता येणार नाही. 'शारदे - पूर्वी सामाजिक समस्यांना कोल्हटकरांनी हात घातलेला होता. 'शारदा' नाटकापूर्वी तीस-चाळीस वर्षे सुधारकांच्या विवेचनांनी आणि भूमिकांनी महाराष्ट्रीय वातावरण दुमदुमले होते. आगरकर 'शारदे'पूर्वीच वारलेले होते. न्या. रानडे व डॉ. भांडारकर यांचे कार्य 'शारदे'पूर्वी बरेच वाढलेले होते. 'शारदा' नाटकापूर्वी आठ वर्षे संमति-वयाचा कायदा मुंबई प्रांताच्या विधानसभेसमोर आलेला होता. विष्णु पंडितांनी पहिला विधवाविवाह यापूर्वीच घडवलेला होता. या सगळ्या समाजसुधारकांच्या यादीत म.फुले यांचे नाव मी मुद्दामच वगळलेले आहे. मराठी वाङ्मयाच्या पहिल्या अवस्थेच्या संदर्भात विचार करायचा तर आमच्या प्रतिष्ठित लेखकांना ज्योतिबा फुले यांचे कार्य आकलन झालेले तर दिसतच नाही, पण जाणवल्यासारखेसुद्धा वाटत नाही. या साऱ्या घटनांचे पडसाद निरनिराळ्या नाटकांमधून उमटत होतेच. बाला-जरठ विवाहावरच 'म्हातारचळ',
जरठोद्वाह', 'कन्याविक्रय दुष्परिणाम', 'पद्मावती' यांसारखी नाटके देवलांच्यापूर्वी लिहिली गेली होती. सुधारकांना विरोधी म्हणून सनातन्यांनीही काही नाटके लिहिली होती.
या सामाजिक नाटकांमधील बहुतेक नाटके प्रयोगात संपूर्णपणे अयशस्वी ठरली.ज्यांना थोडेफार यश मिळाल्यासारखे काही काळ जाणवले ,तीही नाटके ललित