पान:पायवाट (Payvat).pdf/11

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


ज्याना थोडेफार यश मिळाल्यासारखे काही काळ जाणवले, तीही नाटके ललित वाङ्मय म्हणून अयशस्वीच होती. सामाजिक प्रश्न मांडणारे सामाजिक नाटक म्हणून देवलांच्यापूर्वी एकाही नाटककाराचे लिखाण कलाकृती म्हणून विचारात घ्यावे यासाठी आवश्यक असणाऱ्या किमान पातळीपर्यंतसुद्धा पोहोचू शकले नव्हते. तरी पण सामाजिक नाटकांची खळबळ देवलांच्यापूर्वी चालूच होती. 'शारदा' हे पहिले सामाजिक नाटक म्हणताना नेमका अभिप्रेत अर्थ कलाकृतीच्या पातळीवर पोहोचलेले पहिले सामाजिक नाटक असा असतो. हरिभाऊंच्यापूर्वी बाबा पदमनजी आहेत. तरीसुद्धा कलात्मक पातळीवर सामाजिक कादंबरी प्रथम हरिभाऊंनीच नेली असे आपण म्हणतो. कादंबरीच्या क्षेत्रात जसे हरिभाऊंचे यश आहे तसे नाटकांच्या क्षेत्रात देवलांच्या 'शारदे'चे यश आहे. पण हरिभाऊंना आशयाचा वास्तववाद उपजत होता, देवलांना तो प्रयत्नपूर्वकही आत्मसात करता आलेला नाही.
 सामाजिक नाटककार म्हणून देवलांच्याकडे ज्यावेळी आपण पाहू लागतो, त्यावेळी देवलांच्या मर्यादा प्रथम लक्षात येऊ लागतात. आणि हेही लक्षात येऊ लागते की, दोष देवलांचा नसून ज्या पातळीवर सुधारणेची चळवळ देवलांच्या काळी होती, त्या पातळीचा हा दोष आहे. आगरकरांसारखा महान प्रज्ञाशाली पुरुष बुद्धिप्रामाण्यवादाचा आग्रहाने पुरस्कार करताना या काळात दिसतो. पण त्यांनाही समाजसुधारणेचे जे प्रश्न जाणवले, ते पश्चिम महाराष्ट्रातील ब्राह्मणांचे प्रश्न होते. आगरकर सोडल्यास इतर समाजसुधारकांना सुधारणावादासाठी आवश्यक असणारे झुंजार मनच नव्हते. जे सामाजिक प्रश्न या सुधारकांच्यासमोर उभे होते, त्या प्रश्नांचे स्वरूप सर्व गुंतागुंतीनिशी या सुधारक मंडळींना फारसे कळल्याचे दिसत नाही. पुढे याच मुद्दयावर डॉ. केतकरांनी सुधारकवर्गाचा अडाणी म्हणून अधिक्षेप केला आहे. प्रत्येक सामाजिक प्रश्न हा एका सामाजिक परिस्थितीत जन्माला येत असतो. त्या परिस्थितीला निरपेक्ष होऊन प्रश्नाचा विचार करण्यात अर्थ नसतो. ही सामाजिक परिस्थितीच सामाजिक प्रश्नाभोवतालची गुंतागुंत निर्माण करीत असते. आमच्या सुधारक लेखकांना ही बाब नीटशी कधी कळली नाही.
 केशवपनाला विरोध करणाऱ्या हरिभाऊंनासुद्धा आपल्या नायिकेच्या मनात पुनविवाहाचा विचार कधीच आला नाही ही गोष्ट स्पष्ट करताना सुधारक म्हणून संकोचल्यासारखे वाटले नाही. तरुण विधवांच्या मनात पुनर्विवाहाचा विचारच येणे शक्य नसले, इतक्या जर त्या पतीशी एकजीव होत हा सामान्य नियम मानला, तर मग केस तरुणपणी काढले काय अगर म्हातारपणी काढले काय याचे महत्त्व गौण होते. पतीशी एकजीव झालेल्या विधवेला आपण सुंदर दिसावे, आपले सौंदर्य शिल्लक उरावे ही गोष्ट जाणवण्याचे काहीच कारण नाही. केशवपनाचा प्रश्न अपरिहार्यपणे सामाजिक प्रश्न म्हणून विधवाविवाहाशी निगडित आहे, ही गोष्ट हरिभाऊंना जाणवली नाही. आणि विधवाविवाहाचा प्रश्न तितक्याच अपरिहार्यपणे परंपरामान्य असलेल्या पातिव्रत्य या कल्पनेला संपूर्णपणे विरोधी आहे. विधवाविवाह हा सुटा प्रश्न नसतो.

देवलांची शारदा ५