पान:पायवाट (Payvat).pdf/9

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


नाट्याच्या क्षेत्रातील देवलांचा प्रवास हा फारसा सुखद असा कधीच नव्हता. देवल अतिशय चांगले तालीममास्तर होते, ते नाट्यप्रयोग फार चांगला बसवून घेत अशी त्यांची ख्याती आहे. पण नाट्यरचनेवर मात्र दीर्घकाळ त्यांना प्रभुत्व मिळवता आलेले दिसत नाही. त्यांनी लिहिलेले पहिले नाटक 'दुर्गा' हे अनुवादित आणि शोकान्त होते. हे नाटक रंगभूमीवर फारसे प्रभावी ठरले नाही. मराठी रंगभूमीवर शोकान्त नाटके आरंभापासून अधूनमधून येत राहिली. पण शोकान्त नाटके प्रेक्षकांच्या मनाची पकड दीर्घकाळपर्यंत घेऊ शकली नाहीत. शोकान्तिकेला मराठी रंगभूमीवर प्रतिष्ठा व लोकप्रियता मिळवून देणारे नाटककार म्हणून अग्रक्रमाने गडकऱ्यांचा उल्लेख करावा लागेल. कालक्रमाच्या दृष्टीने पाहिले, तर याबाबतचे काही श्रेय खाडिलकरांनाही द्यायला हवे. नंतर देवलांनी लिहिलेले 'विक्रमोर्वशीय' हेही अनुवादित नाटक फारसे प्रभावी ठरले नाही. 'मृच्छकटिक', 'झुंजारराव' व 'फाल्गुनराव' अर्थात 'तसबिरीचा घोटाळा' ही नाटके बऱ्यापैकी यश मिळविणारी ठरली. विशेषेकरून 'फाल्गुनरावां'चे अपयश डोळ्यांत भरण्याजोगे आहे. आपल्या उत्तर आयुष्यात देवलांनी कोल्हटकरांच्या संगीताची प्रतिष्ठा आणि खाडिलकरांच्या 'स्वयंवर', 'मानापमान' यांसारख्या नाटकांची लोकप्रियता व जनमानसावरील पकड मोठ्या आनंदाने पाहिली असेल असे नाही. आयुष्याच्या शेवटच्या काळात देवलांनी खाडिलकरांच्यासमोर आपला पराभव मान्य केलेला आहे. मूळच्या 'फाल्गुनराव' अर्थात 'तसबिरीचा घोटाळा' या गद्य नाटकाचे रूपांतर देवलांनी संगीत नाटकात केले. त्यामुळे 'फाल्गुनराव'चा 'संशयकल्लोळ' झाला. फाल्गुनरावला नव्या रूपात सादर करताना देवलांनी केवळ त्यात संगीतच नव्याने घातले असे नाही. त्यांनी मूळच्या गद्यावरूनही पुष्कळच हात फिरवलेला आहे. आजच्या 'संशयकल्लोळा'तील गद्य संवाद हे शारदा नाटकाच्या यशानंतर ते यश लक्षात घेऊन सुधारून घेतलेले आहेत. आणि संगीताच्याबाबत त्यांना 'मानापमाना'वर ताण करायची होती. देवलांच्या 'संशयकल्लोळा'ला मराठी रंगभूमीवर अफाट लोकप्रियता मिळाली. पण ती पाहण्यास देवल हयात नव्हते. त्यांच्या मृत्यूनंतर अव्वल दर्जाची लोकप्रियता व डोळे दिपवणारे यश या नाटकाला मिळाले. पण ते देवलांचे यश नसून ती त्यांनी खाडिलकरांना दिलेली शरणागती होती.
 'मृच्छकटिक' आणि 'झुंजारराव' यांना इतके यश मिळाले नाही. फार मोठे संवादकौशल्य किंवा नाट्यप्रयोगाची जाण नसूनही आगरकरांच्या 'विकारविलसिता'ला जे यश मिळाले, त्याच्याजवळ 'झुंजारराव' कधी जाऊ शकला नाही. 'फाल्गुनराव'नंतर देवलांनी लिहिलेले 'शापसंभ्रम' नाटकही जवळजवळ अयशस्वीच ठरले असे म्हणायला हरकत नाही. ही सारी नाट्यसृष्टी अनुवादित, आधारित आणि सुमार यशाची होती. देवलांच्या ज्या प्रासादिक गद्याची आपण मुक्त मनाने स्तुती करतो, ते या नाटकांच्यामधून क्रमाने विकसित होत गेलेले आहे.

देवलांची शारदा ३