पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/147

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण आठवें । १०७ नगी झाली. या धामधुमीच्या संधीचा फायदा घेऊन पंढरपूर येथलि कुळकर्णी गोविंद जोती थिटे यांनी कांहीं लोक जमा करून लुटालुटीस आरंभ केला. गणपतरावास ही बातमी कळतांच ते तातडीने सोलापुराहून पंढरपुरास आले, व थिट्याचा मोड करून माघ वद्य १३ रोजी त्यांनी त्यांस जिवंत पकडून कैदेत ठेविलें. नंतर बाळकृष्ण गंगाधर याचा पाठलाग करून चैत्र शुद्ध तृतीया शके १७२३ रोजी त्यास पकडले व त्याची पुण्यास रवानगी केली. तसेच जिवाजी यशवंत याचा मांडवगण येथे मोड झाल्यामुळे तो नर्मदापार पळून गेला. अशा रीतीने होळकराचे सैन्याचा मोड करून त्यास या दोन सरदारांनीं नर्मदेपलीकडे पिटाळून लावले. अशा रीतीने फिरून शांतता प्रस्थापित केली. जयवंतराव यशवंत हे शके १७१२ सालीं वारले. त्यांना भिवराव नांवाचे पुत्र होते. या भिवरावाचे चुलते भिवराव यशवंत हे होते. अर्थात् ते वारल्यावर च या धाकट्या भिवरावांचा जन्म झाला असला पाहिजे; त्याखेरीज हयात चुलत्याचे नांव पुतण्यास ठेवतां येणे अशक्य होय. पहिले भिवराव हे शके १७०० मध्ये वारले, त्यामुळे, त्या शकाच्या नंतर या दुस-या भिवरावांचा जन्म झाला असावा, हे उघड होय. जयवंतरावानंतर त्यांची सरदारी या भिवराव जयवंताच्या नांवे झाली. या भिवरावांच्या नांवची सरकारी आज्ञापत्रे शके १७२४ पासून आढळतात. यापुढील पेशवे सरकारच्या स्वाध्या-शिकायांत या भिवरावाचे अंग होते. या भिवरवांना गोपाळराव या नांवाचा एक वडील भाऊ होता. तो कर्नाटकातील एका लढाईत सरकारच्या कामास आला. एवढा एके ठिकाणी उल्लेख आढळतो. यापेक्षां गोपाळरावासंबंधानें ज्यास्त माहिती मिळत नाहीं. कर्नाटकांत ज्या लढाया झाल्या त्यांतून पानसे हे आपल्या तोफखान्यानिशीं जातीनें हजर असत, याच वेळी त्यांनी आपल्या तोफा तयार करण्याचा कारखाना वाढवून त्यांत मोठमोठ्या नामांकित तोफा तयार केल्या. या वेळी भिवराव यशवंत, गोपाळराव जयवंत, रंगराव पुरुषोत्तम, गणपतराव विश्वासराव व माधवराव कृष्ण या पानसे घराण्यांतील प्रमुख व्यक्ति होत्या. एकाच कामावर असे भाऊबळ वांटल्यामुळे व ते सर्व एकजुटीने स्वामिकार्याकरितां झटत असल्यामुळे, कर्नाटकांत झालेल्या हालचालींत विजयश्रीची माळ मिळविण्यांत यांची कर्तबगारी बरीच उपयोगी पडली, या मुळे यांचे वजन दरबारांत पुष्कळ च वाढलें. हे वाढलेले वजन व पूर्वी नाना फडणिसाचे कारस्था-- नांत पानशांनी त्यांना बरचि मदत केली होती हैं शल्य खुद्द श्री. रावबाजी, त्यांचे कारभारी माणकेश्वर व सल्लागार मुत्सदी त्र्यंबकजी डेंगळे वगैरे कुटिल लोक यास असह्य होऊन त्यांनी कांहीं तरी निमित्ताने पानशांचा पाडाव करावा व त्यांचे वाढते तेज कमी करावे असे कारस्थान चालू केले होते. त्यास पोषक असे खाली लिहिलेले प्रसंग त्यांनी घडवून आणविले.