पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/77

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 हे काय बोलता? मला लाजवू नका.' सदा म्हणाला. 'हे तुमच्या लेकीचंच घर आहे. या आत!'

 ‘पण मी थांबू शकत नाही. एक अर्जट मिटिंग आहे.' अभय म्हणाला. 'मी आता जातो व उद्या येतो - उद्या चवथ्या शनिवारची सुट्टी आहे. निवांत बोलता येईल ना मग मी गुरुजींना परत घेऊन जाईन...!' आणि अभय जीपनं निघून गेला.

 सुनंदा फुलारून आली होती. तिचे धर्मपिता - तिचे गुरुजी तिचा संसार पाहायला आले होते. तिचा राखीभाऊपण आला होता. इतक्या दिवसांची कसर भरून निघाली होती.

 सदाची व आबा गुरुजीची तार चांगलीच जुळली होती. रात्रीचं जेवण आटोपून ते बाहेर मोकळ्यावर बाज टाकून गप्पा मारीत बसले. सुनंदाही त्यात सामील झाली.

 आणि बोलण्याच्या ओघात सदानं आकाशवाडीच्या पाण्याच्या दुर्भिक्षाबद्दल कल्पना दिली. झालंच तर सुनंदाच्या पायगुणानं यावर्षी नेहमीपेक्षा तळ्याचं पाणी दोन महिने जादा कसं पुरलं, हेही सांगितलं.

 ‘या गावात पाणीच नाही आबा, काय करणार? हा प्रश्न आमच्या पाचवीला पुजला आहे....!' सदाचा वैताग शब्दाशब्दातून प्रतीत होत होता. 'डोंगरावरचा हा पठारी मुलूख' इथल्या मातीत खडकच जास्त आहे. पाण्याचे झरेच नाहीत, असंच जी. एस. डी. ए. वाले सांगतात, त्यामुळे इथं नळयोजनाच होऊ शकत नाही....!'

 अचानक सुनंदाला स्मरण झालं की, आबा जमिनीतलं पाणी हेरतात, दाखवतात. ते जन्मतः म्हणे पायाळू होते. केवळ कान लावून, पदस्पर्शित जमिनीखाली पाणी आहे की नाही, हे सांगतात आणि त्यांचं अनुमान नव्वद टक्के प्रकरणात खरं ठरलेलं आहे. त्यांना विचारावं का, या गावात कुठे पाणी आहे का हे तपासून पाहायला....

 ‘आबा, मी तुमचा लौकिक जाणते. तुम्ही जमिनीखालचं पाणी खात्रीनं आहे की नाही सांगता. मग उद्या या गावात चक्कर मारून सांगा ना - कुठे पाणी लागेल का?-

 सदा तिच्याकडे खुळ्यागत पाहात राहिला. 'अगं हे काय? भूगर्भशास्त्रज्ञांनी इथे पाणी नाही, असं सर्व्हे करून जाहीर केले. तेथे आबा काय सांगणार?'

 'तसं नाही जावई बापू हेही आमचं शास्त्र आहे.' आबा गंभीर होत म्हणाले, फार तर म्हणा की - परंपरागत शास्त्र आहे. पायाळू माणसाला एक अतिरिक्त ज्ञानेंद्रिय असतं . मलाही ते आहे व त्यामुळेच जमिनीखाली पाणी आहे की नाही हे मी सांगू शकतो. आणि दहामधील नऊ प्रकरणात माझा अंदाज आजवर खरा ठरलेला आहे....!'

 दुस-या दिवशी आबा व सदा आकाशवाडीचा फेरफटका मारायला निघाले. मध्ये मध्ये ते थांबत, पायातली वहाण काढून पायाने जमिनीवर थपथप करीत, कुठे उकिडवे बसून जमिनीला कान लावत. 'नाही इथं नाही....' असं ते पुटपुटत. असं जवळपास घंटाभर चाललं होतं. सदा कंटाळला होता, पण सुनंदानं त्याला आबाबद्दल इत्थंभूत सांगितल्यामुळे विश्वास ठेवणं भाग होतं.

खडकात पाणी / ७५