पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/76

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 आता शाळेला सुट्या लागल्या होत्या. शाळेचा ग्रंथालयातील काही पुस्तकं वाचण्यासाठी सदानं घरी आणली होती. तिला वाचनाची आवड होती. अशाच एके दुपारी सदा जेवणानंतर झोपला होता व ती एक पुस्तक वाचीत मधल्या अंगणात भिंतीच्या सावलीत बसली होती.

 कडक ऊन, वारा मुळीच नाही. वाढतं उष्णतामान..... दोन दिवस स्नान नसल्यामुळे घामाची वाळून शरीरावर चढलेली पुटं - आपला घाम पुसताना त्याची तुरट लागणारी चव.... मन मिटून जावं, कोषात दडावं असं वातावरण; पण प्रयत्नपूर्वक ती त्या गुलजार कादंबरीत स्वतःला रमवत होती.

 आणि कसलासा आवाज झाला, म्हणून ती पुढे झाली. दारात एक जीप थांबली होती. तिनं घाईघाईनं नव-याला उठवलं. तो शर्ट अंगात चढवीत पुढे झाला.

 'अगं, ही तर बी. डी. ओ. ची जीप आहे तो पुटपुटला. 'इथं कशासाठी आले असतील ते कळत नाही."

 तो सामोरा जात म्हणाला, 'नमस्कार साहेब, मी इथल्या प्राथमिक शाळेचा शिक्षक सदानंद कुलकर्णी....!"

 'नमस्कार....! मी तुम्हाला ओळखतो कुलकर्णी सर! तुमच्या लग्नात मी होतो' बी. डी. ओ म्हणाले, “मी सुनंदाचा राखीभाऊ आहे, माझी बहीण आहे ती"

 सुनंदा पुढे झाली. हा तर अभय होता. तिचा मोठ्या भावाचा वर्गमित्र तिच्याकडून दरवर्षी राखी बांधून घ्यायचा. हा केव्हा बी. डी. ओ. झाला?

 'अगं तुझ्या लग्नाच्यावेळी माझी गटविकास अधिकारी म्हणून नुकती निवड झाली होती. ट्रेनिंग झालं व इथं पंधरा दिवसांपूर्वी पोस्टिंग झाली.' अभय म्हणाला.

 'आधी आत ये ना दादा....!' ती म्हणाली.

 'हो हो, आत या साहेब' सदा म्हणाला.

 'पण मी बोलण्याच्या नादात विसरून गेलो माझ्या जीपमध्ये कोण आहे पाहिलंस का?' अभय म्हणाला.

 तिनं जीपमध्ये डोकावून पाहिलं आणि तिचा विश्वासच बसेना. तिच्या गावचे आबा गुरुजी होते.

 ‘आबा तुम्ही? इथं? माझा विश्वासच बसत नाही.' तिला आनंदाने शब्द फुटेना. 'या - या आत या?'

 'अगं पोरी, हा जीप घेऊन आला, तेव्हा विचार केला... तुला भेटून यावे - तुझ्या बापानंही मला आग्रह केला - एकदा जाऊन पोरीचा संसार पाहून ये म्हणून '

 "इतक्या दिवसांनी आठवण झाली आता आपल्या लेकीची.... ।' फुरंगटत ती म्हणाली.

 'अगं हो- जरा दमानं ! मला घरात तर घे!' आबा म्हणाले, 'काय जावई बापू - आज तुमचा पाहुणचार घ्यायला आपणहून आलोय न बोलवता, चालेल ना?"

पाणी! पाणी!! / ७४