पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/78

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 असं करीत करीत ते तळ्याजवळ आले. तळे कोरडं पडलं होतं. सदाचा आधार घेत आबा गुरुजी तळ्यात उतरले. तिथं गोल गोल फिरले, तिथल्या ओलसर मातीला कान लावले, क्षण, दोन क्षण ते तसेच होते आणि मग ओरडून म्हणाले,

 'इथं - इथं पाणी आहे. या तळ्याच्या खाली जिवंत पाझर आहे आणि ते पाणी अक्षय आहे....!'

 ‘पण आबा, या तळ्याखाली तर प्रचंड खडक आहे."

 'तो फोड़ा, पाणी लागेल!'

 ‘पण ते किती कठीण - खर्चिक आहे. पुन्हा जी. एस. डी. नं इथं या गावात पाणी नसल्याचं सर्व्हेक्षणाअंती जाहीर केल्यामुळे शासन काहीच करू शकणार नाही.

 'ते मला माहीत नाही; पण माझ्या आजवरच्या अनुभवाच्या आधार सांगतोय, इथं या तळ्याखाली खडकाच्या आत पाणी आहे, हे निश्चित !'.

 सुनंदा ते ऐकून हर्षभरित झाली. 'माझी खात्री आहे, आबा म्हणाले म्हणजे तिथं पाणी नक्की असणार आहे....'

 पण त्यानं शासकीय अडचण सांगितली, तेव्हा ती झटकन म्हणाली, "पण आता इथं अभयदादा बी. डी. ओ. आहे, तो हा प्रश्न सोडवील ना!'

 दुपारी अभय आला, तेव्हा भोजनानंतर हा विषय निघाला. तो या तालुक्याचा गटविकास अधिकारी असल्यामुळे त्याला आकाशवाडीच्या भीषण पाणीटंचाई जाणीव होती. त्यामुळे आबांनी तळ्याच्या खाली पाणी असल्याचं सांगितलं तेव्हा तो म्हणाला,

 'आबा गुरुजींना मी मानतो कुलकर्णी सर... कारण मी प्रत्यक्ष अनुभवले आहे जिथं जी. एस. डी. ए. नं पाणी नाही म्हणून सांगितलं, तिथं आबांनी पाणी असल्याचं सांगितलं व तिथं खरंच पाणी लागल्याचं मी पाहिलं आहे. पण आता मी बी. डी. ओ. आहे, मला जी. एस. डी. ए. चा सल्ला धुडकावता येणार नाही - तर ही पाहातो काय करायचं ते!'

 सभापतींना अभयनं ही बाब एकदा चर्चेच्या ओघात सांगितली. तर सभापती हसून म्हणाले, 'मला माहीत आहेत आबा गुरुजी - ते पाणीवाले गुरुजी म्हणून प्रसिद्ध आहेत. ते म्हणताहेत तर रिस्क घ्यायला हरकत नाही.....!',

 अभयनं आकाशवाडीच्या तळ्यात 'इनव्हेल बोअरिंग घेण्याचा निर्णय घेतला आणि तिथं बोअरिंग मशिन येऊन दाखल झाली.

 कामाला प्रारंभं करण्यापूर्वी सरपंचांनी सुनंदाला बोलावून घेतलं. 'पोरी इथं आलीस ते सकुन घेऊनशानी - तुच नारळ वाढव इथं बोअरिंग होण्यापूर्वी...

 तिनं हात जोडून, डोळे मिटून देवाचं स्मरण केलं. आणि नारळ फोडला तिच्या डोळ्यापुढे कृष्णामाई होती!

 जवळपास दीडशे फुटावर खडक फोडून जमिनीचा वेध घेतल्यावर बोअरिंगवाल्यानं जाहीर केलं, 'चमत्कार म्हणायचा हा! इथं चांगलं तीन ते साडे इंच पाणी लागलंय....!'

पाणी! पाणी!! / ७६