पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/41

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


त्याच्या दुधाची परवड चाललीय... काही म्हणून काम करायला नको... अशा वेळी पण. मग याला पुरुष कशाला म्हणायचं? आपल्या शरीरावर हक्क गाजवतो म्हणून?'

 तिला वाटलं होतं... हणमंता आपलं ऐकेल. आपण जोडीनं कामावर जाऊ. म्हणजे मुकादमाची लुब्री नजर शांत होईल.. बिनधोकपणे काम करता येईल. पण छे... आपल्याकडे का पुरुष घरच्या बायकांचे ऐकतात... हा आपला नवरा तर शहाण्णव कुळीचा.. तो कसा ऐकेल?

 आपल्या मनातले बंडखोर विचार तिला पेलवेनात. तेव्हा प्रयत्नपूर्वक ते तिला मनाआड करावे लागले होते.

 पण आज तीन महिन्यानंतर पुन्हा तसेच विचार मनात येत होते आणि पुन्हा एकदा मन शिणत होते !

 कामाची तपासणी करून इंजिनिअर साहेब गेले आणि कामाला सुरुवात झाली. गजराही आपल्या गँगमध्ये काम करू लागली. पुरुष - गडीमाणसं माती खोदीत होती व टोपल्यातून ती माती भरावावर स्त्री मजुरांमार्फत टाकली जात होती...

 आता कामाला गती आली होती. उन्हं वाढत होती, त्याचे चटके बसत होते. अगं घामेजली होती; पण पदरानं घाम पुशीत काम अव्याहत चाललं होतं...

 दुपारी जेवायची सुट्टी झाली, तेव्हा झाडाखाली आपल्या मैत्रिणीसोबत गजरानंही भाकरीची पुरचुंडी सोडत जेवायला सुरुवात केली. भरपूर घाम गाळल्यानंतर हायब्रीडची भाकरीही आताशी गोड वाटत होती !... ती खुदकन हसली.. आपण बदलत आहोत... शरीरानं आणि मनानंही. शरीरानं जास्त चिवट, अधिक कणखर. मनानं बंडखोर व विचारी.

 पुन्हा एकदा ती सल ठसठसू लागली...

 मुकादम आता आपल्याकडे पहिल्यासारखं अभिलाषी नजरेनं पाहात नाही. का? या प्रश्नानं ती बावरली आणि कानात त्याच वेळी हणमंताचे ते बोल घुमू लागले. आता आपण पूर्वीसारखे आकर्षक राहिलो नाहीत?... देहाची पुष्टाई व गोलाई कष्टाच्या कामानं कमी झाली आहे हे खरं.. त्यामुळे का आपलं स्त्रीत्व.. बाईपण अनाकर्षक होतं? हा पुरुषी कावा आहे.. त्यांचा विकृत ओंगळ दृष्टिकोन आहे. बाईमाणूस म्हणजे फक्त तिचं शरीर? त्यातलं मन, त्या मनाचं प्रेम .. निष्ठा काहीच नाही?

 हणमंता हा आपल्या कुंकवाचा धनी. सारं काही आपण त्याला दिलं. हे शरीर तर त्याच्या हक्काचं आहे, पण हे मनही त्याला दिलं. त्याचं धन्याला काहीच अप्रुप नाही!


बांधा / ३९