पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/42

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 आपल्या शरीरातला बदल त्याला जाणवला, पण मनातला केव्हा जाणवणार? ज्या क्रमानं शरीर झडत गेलं, त्याच क्रमानं मन उन्नत होत गेलं. अनुभवाच्या शाळेत शिकता शिकता, रोजगार हमीच्या कामावर मुक्त श्वास घेता घेता खूप काही समजून येतंय आणि मनात नाना प्रश्न उभे करतंय...

 हे सारं हणमंताशी गजरा कधी बोलली नव्हती. का ? विचार करता तिच्या मनानं कौल दिला की, धनी हे कधी समजून घेणारच नाहीत. त्यांना फक्त देह कळतो, त्यात एक मनही असतं, हे त्यांना कधी समजून घ्यावसं वाटतंच नव्हतं !

 मीच खुळी... सतत आपल्याभोवती धनी कबुतराप्रमाणे घुमायचे. माझ्या शरीराचे लाड लाड करायचे. आपण त्याला प्रेम.. प्रीती समजलो. संसार मानला. आपली ती चूक होती. तो केवळ वासनेचा उमाळा होता. शरीराची गोलाई कमी झाली, बांध्याचा उभार ढासळला आणि त्यांचं लक्षही उडालं...

 गेल्या कित्येक रात्री रंगल्या नव्हत्या. प्रत्येक वेळी तो असमाधानी, ती बेचैन. त्याचं कारण हे तर नसेल...?

 ...दिवसभर गजरा यंत्रवत गतीनं काम करीत होती, पण मनात हे असे विचार पुन्हा पुन्हा येत होते आणि मन प्रक्षुब्ध होत होतं.

 चारच्या सुमाराला मुकादमानं सांगितलं... आज मागच्या हप्त्यांचा पगार होणार आहे. साऱ्यांचे चेहरे फुलून आले. गजरालाही बरं वाटलं. कारण कालच घरातल पीठ संपलं होतं. मीठ - मिर्चीपण जेमतेम होती. बरं झालं... कुपनावर रेशन दुकानात जाऊन गहू घेता येतील व इतर सामानही उद्या बाजारात खरेदी करता येईल...

 कमरेला गाठीत पैसा मारून गजरा वेगानं परतीच्या वाटेला लागली होती... घराची ओढ मनाला अधीर करीत होती... व्यंकूच्या आठवणीनं वात्सल्य उफाळून आलं होतं. हल्ली व्यंकूला जवळही घेता येत नाही वेळेअभावी...

 औंदाचा मौसम जवळ येतोय. पीकपाणी ठीक झालं तर दैन्य कमी होईल. कदाचित रोजचं हे उरस्फोडी रोजगार हमीचं काम करायची पाळी येणार नाही. आराम मिळेल, हे सुकलेलं शरीर पुन्हा भरून येईल.. पुन्हा आपण हणमंताच्या प्रेमाला पात्र होऊ...

 ‘आईऽगं...' गजराला जोरदार ठेच लागली होती. आपल्या विचाराच्या नादात चालताना तिला भान राहिलं नव्हतं. कळवळून ती काही क्षण खाली बसला रक्ताळलेला अंगठा तिनं दाबून धरला. कळ ओसरताच पुन्हा ती उठून चालू लागली...

 पण आपण पूर्वीप्रमाणे हणमंताशी समरस होऊ...?


पाणी! पाणी!! / ४०