पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/40

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


करतो याचा तिला विषाद वाटला, पण त्याकडे दुर्लक्ष करून ती काम करीत राहिली होती !

 त्या रात्री किती वेळ तरी ती हणमंताच्या कुशीत हमसून रडत होती. 'धनी, ही काय पाळी आणली वो तुमी माझ्यावर ?'

 "खरं सांगू गजरा, तुझं हे आजचं कामावर जाणं मला पसंद नव्हतं. मी तुला कालच म्हणलं होतं - ही आपली कामं नव्हेत. काही झालं तरी इनामदाराचं घराणं आपलं!'

 ‘ते नगा सांगू मला - घरात व्यंकू - आपलं एकुलते एक पोर भुकेनं रडतंय... त्याचं बोला...'

 'मी आज - उद्या काहीतरी बंदोबस्त करतो पैशाचा - साले, सर्वजण चोर आहेत. एवढे त्यांच्यावर उपकार केले, पण वेळेला एकही मदत करीत नाही.'

 'धनी, संकट का एखाद्यावर आले आहे? साऱ्यांनाच या दुष्काळाचा तडाखा बसला आहे. साऱ्यांचेच हे हाल आहेत.'

 क्षणभर गजरा घुटमळली, बोलायचं धाडस होत नव्हतं. तरी पण चाचरत धीर एकवटून म्हणाली, 'जो मार्ग मी पत्करलाय, तो नाही तुम्हाला जमणार ? - जोडीनं कामावर जाऊ रोजगार हमीच्या. अनेकजण तसे येतात. रोज तीन किलो धान्य मिळेल कुपनावर - हत्याला शंभरसव्वाशे रुपये पण मिळतील...'

 "काय म्हणतीस ? मी तुझ्यासंग रोजगार हमीच्या कामाला येऊ ? येडी का खुळी ? हा इनामदार , चव्हाणाच्या खानदानीचा मजूर म्हणून काम करील ? छुट्, ते शक्य नाही..'

 'मी नाही जात ?' गजरा शांतपणे म्हणाली, “वेळवखत आला की मानपान बाजूस सारावा लागतो आणि कर्ज करण्यापेक्षा, उसनंपासनं घेण्यापेक्षा कष्ट करून रोजीनं दहा - बारा रुपयेच का होईना कमावणं चांगलं नाही का?”

 'गजरे, एक दिवस कामावर गेलीस अन् चुरूचुरू बोलायला लागलीस ? हे तुझे भिकारडे विचार तुझ्याजवळच ठेव. मला ते पटायचे नाहीत. मी तुला कामावर जाऊ देतोय ते मोप हाय...'

 आणि त्यानं हा विषय तिथंच संपवून टाकला होता.

 हताश होऊन गजरा आपल्या नव-याकडे पाहात राहिली. हा पहिलाच प्रसंग होता, जेव्हा तिला आपल्या नव-याची मनस्वी चीड आली होती. 'असला कसला हो अट्टाहास?.. वेळवखत जाणता येत नाही.. घरी पोटचा पोर उपासमारीनं सुकलाय.

पाणी! पाणी! / ३८