पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/175

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आजही ती चार दिवसांनंतर स्नान करत होती, तरीही त्याचे तेच टोमणे. पण तिनं आताशी आपलं मन मुर्दाड बनवून त्याकडे सोयिस्करपणे दुर्लक्ष करायला सुरुवात केली होती.

 'आज मैं तालुक्याला जाता हैं अमिना. हो सकता है दो रोज नहीं आऊ वापस मैं...'

 तो गवंडीकाम करायचा. अलीकडे त्याने तालुक्याला जाऊन काम करायला सुरुवात केली होती. तसा त्याचा हात कसबी होता. काम मिळायचं, मिळकतही चांगली व्हायची; पण ती तो दारूत उडवायचा. अमिनाची शंका होती की, तालुक्याला एकीला ठेवलं असावं. एक - दोनदा तिला झोंबताना तो म्हणून गेला होता. 'चांद, चांद...!'

 त्याचंही अमिनाला फारसं काही वाटत नसे; पण आपला देहभोग टळत नाही हा विषाद होता.

 आणि मुख्य म्हणजे आपल्या व्यसनामुळे आपल्या पाऊण डझन पोरांना धड दोन वेळचं जेवणही देता येत नाही, याचं त्याला काही वाटत नसे. तो म्हणायचा, ‘हरेक ने खुद को देखना. अल्लातालाने जनम दिया है, तो वो जरूर दानापानी देंगा ही !'

 त्यामुळे मोठी सकिना व तिच्या पाठचा बब्बर गावात काही ना काही काम करत आणि ते मिळालं नाही तर चार काटक्या किंवा हिरवा पाला तरी आणत.

 हे मात्र अमिनाला फार खुपायचं. नकोशा वाटणा-या संगातून झाली असली तरी तिला आपली पोरं जीव की प्राण होती. त्यांचं करपलेलं व कसलंही भविष्य नसलेलं बालपण तिला दुखवून जायचं.

 त्यामुळेच गेल्या वर्षापासून तिनंच कंबर कसून रोजगार हमीच्या कामावर जायला सुरुवात केली होती.

 नवव्या बाळंतपणानंतर तिला कमालीची अशक्तता आली होती; पण दोन महिने होताच तिनं पुन्हा कामावर जायला सुरुवात केली.

 आज ती जेव्हा कामावर पोचली, तेव्हा अजून कामाला सुरुवात झाली नव्हती. कारण अजून मुकादम यायचा होता, अजून हजेरी व्हायची होती.

अमिना / १७३