पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/176

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 मग ती आपल्या नेहमीच्या गॅगमध्ये सामील झाली. गजरा, लंका, सोजर या तिच्या राजीवनगरमधल्या मैत्रिणी. त्या झाडाखाली तंबाखू मळत बोलत बसल्या होत्या.

 ‘ये अमिना, तब्येत बरी हाय ना तुजी? सोजरनं आपुलकीनं विचारलं.' आणि पाहता पाहता तिचे डोळे भरून आले. ‘क्या धाड पडलीय मेरे तब्येत को सोजर? बच्चे पैदा करने की मशिन जो हूं मैं.... मशिन को थोडाच दिल होता है?'

 ‘ऐसा क्यों बोलती है पगली? हम हैं ना तेरे साथ.' लंका म्हणाला.

 ‘वो तो हैच. बस तुम से बोलती हूँ और दिल को तसल्ली कर लेती हूँ...'

 ‘पण ते जाऊ दे, अमिना - लंका, माहीत आहे, आज पगार होणार आहे दोन पंधरवड्याचा....' गजरानं माहिती दिली, ‘म्या निघत व्हते कामाला, तवा मुकादम जात होता बस-स्टॅडवर सायेबांना आणण्यासाठी.'

 या बातमीनं अमिनाच्या चेहऱ्यावर थोडी टवटवी आली. निदान दीडशे रुपये तरी सुटत होते. याशिवाय गेल्या वर्षात अमिनाने सतत दीडशे दिवस रोजगार हमीचे काम केल्यामुळे पंधरा दिवसांचा रोजचे बारा रुपये याप्रमाणे बाळंतपणाचा भत्ता नियमाप्रमाणे मिळणार होता.

 मुकादमनं तिचा फॉर्म भरून घेतला होता व त्यानं तिचा अर्ज साहेबाकडून मंजूर करून घेतला होता. यासाठी त्याला त्यातून पन्नास रुपये द्यायचे ठरले होते. कदाचित आज ते पैसेही मिळण्याची शक्यता होती.

 ते काम पाहणारा कनिष्ठ अभियंता - ‘विंजेनिअर सायेब' मुकादमासह आला. त्याच्या हातात भलीमोठी फुगलेली चामड्याची बॅग होती. त्यात रोजगार हमी वाटपाचे पैसे असणार हे साऱ्यांच्या लक्षात आलं होतं व त्यांच्या अंगात उत्साह संचारून आला होता.

 पैशाचे वाटप दुपारी चार वाजता होणार होते.

 सारेजण उत्साहाने कामाला लागले होते.

 मुकादमनं अमिनाला सांगितलं होतं, आज तुझे बाळंतपणाचे पैसे मंजूर झाले आहेत, ते पण साहेब देतील.'

पाणी! पाणी!!/ १७४