पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/174

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गावी मजहबी कामासाठी अधूनमधून जाणा-या कादरचा मात्र अमिनासाठी सक्त हुकूम होता 'पर्दाच हमारी औरतों की शान है, उसे पहेननाच मंगता है...'

 त्याच्या फाटक्या किरकोळ देहात मात्र जबरदस्त हुकमी आवाज होता. तो तिला त्याची आज्ञा बिनचूक पाळण्यास मजबूर करायची.

 आज सकाळीच त्यानं तिला जवळ ओढून यथेच्छ भोगलं होतं. त्यांच्यामध्ये त्यांची चार महिन्यांपूर्वी जन्मलेली पोर होती. तिचं रडणे चालूच होतं, तरीही त्याचा कादरवर सुतरामही परिणाम झाला नव्हता. वेळी - अवेळी त्याला तिचं शरीर लागायचं. तिच्या इच्छेचा प्रश्नच येत नसे. खरं तर सकाळी उठून घरची कामं करून नऊ वाजता बंडिंगच्या कामावर जायच्या वेळी असं शरीर कुस्करून, दमवून घेणं तिला परवडणारं नव्हतं. तिचं मन तर केव्हाचं विझून गेलं होतं. निकाहनंतर पहिल्या वर्षा-दोन वर्षातली रक्ताची उसळ निवत गेली. त्याचं कारण म्हणजे कादरसाठी असलेलं फक्त तिच्या शरीराचं अस्तित्व. तिला मन, भावना व शृंगार असतो, हे त्याला कुठे माहीत होतं?

 सततच्या बाळंतपणानं शरीराचा चोथा झाला होता. मन तर देहभोगाला किळसलं होतं. पुन्हा त्याचे टोमणे ‘साली चिप्पड हो गयी है. कुछ मजा नहीं आता.' अशा वेळी ती विझून जायची. स्वतःला अलिप्ततेच्या कोशात दडवून घ्यायची आणि आपलं मन शून्य करून त्याला देह द्यायची.

 आजही असंच घडलं. तो पुन्हा अलग होऊन घोरू लागला. अमिनाला मात्र एक किळसवाणी ठुसठूस डाचत होती. ठणकणाऱ्या, दमलेल्या शरीरात नेटानं बळ आणीत ती उठली. दाताला मिश्री लावत केस बांधले. स्टोव्ह पेटवून चहा करून घेतला. गुळाचा चहा तिला आवडत नसे; पण गेले तीन महिने रेशन दुकानात साखरच आली नव्हती. त्यामुळे गुळाचा चहा घेणं भाग होतं. मग भाकऱ्या थापणं, पोराना खाऊ घालणं, मधूनमधून मोठ्या पोरीला - सकिनाला धपाटे घालीत काम सांगणे, उठलेल्या कादरला चहा देणं, स्वतःची आंघोळ उघड्यावर कशीबशी उरकणं, त्यावेळी इतर हिरव्या पुरुषांच्या वाळलेल्या तरी स्त्रीत्वाच्या खुणा बाळगणाऱ्या देहावर नजरेनं सरपटणाऱ्या वासनांचे आघात सहन करणं, कादरचं पुन्हा हुकमी ओरडणं, ‘बेशम, नाचीज, बड़ा मजा आता है ना तुझे सरेआम नंगी होकर नहाने में?' खरं तर रोजगार हमीच्या कामावर जाऊन आल्यावर सारं अंग धुळीनं माखलेलं असायचं, सायंकाळी स्वच्छ स्नान करावंसं वाटायचं; पण कादरचा दराराच असा होता की, तिची हिंमत व्हायची नाही. असंच दोन - तीन दिवसांत केव्हातरी भल्या पहाटे स्नान करायची ती.

पाणी पाणी!! / १७२