पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/16

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

‘त्याला मी काय करू?' ही त्या खुर्चीत बसलेल्या इंजिनिअरची थंड प्रतिक्रिया. त्यावेळी महादूला वाटलं, त्याचं बखोटं पकडावं आणि गदागदा हलवावं. पण यातलं तो काही करू शकला नाही.

 किती वेळ तरी तो नुसताच आतल्या आत उकळत राहिला आणि मग कंटाळून थंड झाला.

 हे..हे सारं थांबलं पाहिजे. महादूच्या डोक्यात विचार येत होते... यावर्षी असं पाणी मध्येच श्रीमंत शेतकरी लाटतील, सरकारही त्यांनाच साथ देईल असं वाटलं नव्हतं. पुन्हा असं होऊ नये म्हणून खबरदारी घेतली पाहिजे. त्यासाठी भांडलं पाहिजे, ओरडलं पाहिजे...

 पण आपण एक सामान्य शेतकरी प्रपंचात आकंठ बुडालेले. या वर्षी आमदारासमोर निदर्शने केली, त्यात आपणही होतो. त्यानं काय फायदा झाला? आपल्या तालुक्यात समर्थ नेते नाहीत आणि जे आहेत ते कमअस्सल आहेत. त्यांना तालुक्याच्या विकासाची पर्वा नाही.

 आपण फार हतबल आहोत... आपली ही परवड कधीच संपायची नाही, असं दिसतंय....

 त्यानं एक दीर्घ निःश्वास सोडला. तो उठून उभा राहिला. एक मनसोक्त आळस दिला. इतर सर्वजण कामाला उठले होते. तोही कामाला लागला.

 चारच्या सुमाराला चौधरीच्या वाड्यावरून चहा आल्याची सूचना त्यांच्या मुनिमाने दिली, तसं काम थांबलं. सर्वजण चहा घेऊ लागले. एका कपात चहा महादूपुढे आला.

 त्याला क्षणार्धात काय वाटलं की... त्यानं चहा नाकारला आणि तो पुन्हा मळ्यात जाऊन कामाला लागला.

 उन्मादानं त्यानं स्वतःला कामाला जुंपून घेतलं. त्याच्या अंगात कसला आवेश संचारला होता की? वेगानं तो उसाच्या दांड्यावर घाव घालीत होता आणि तोंडाने पुटपुटत होता...

पाणी! पाणी!! / १४