पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/15

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नेते कुचकामी आहेत, कमअस्सल आहेत... ते काही म्हणून काही करू शकणार नाहीत....

 किती उमेदीनं मेहनत करून आपण ऊस लावला. पाण्याचा पहिला हप्ता बंधा-यातून उसात फिरवला तेव्हा आनंद काळजात मावत नव्हता. दरवर्षी बाजरी पेरायची आणि पावसाच्या दयेवर विसंबून राहायचा आपला सदाचाच दुष्काळी तालुका. पाऊस फारच कमी व अनियमित. जे उगवून यायचं, ते खंडी दोन खंडीपण नसायचं. कसंतरी दसऱ्यापर्यंत पोट भरायचं आणि दसरा संपला आणि गावाच्या मारुतीची जत्रा आटोपली, की भ्रमंती सुरू. कारखाना सुरू होण्यापूर्वी मेंढरं घेऊन कोकणात जात असू, तर आता ऊसतोडीसाठी इकडे यावं लागतं.

 या वर्षी हे दुष्टचक्र संपणार, आपणही आता ऊस मालक आहोत. या दोन एकरात ऊस पुरा वाढला की बक्कळ पैसा येईल. थोडं कर्ज फेडू आणि बायकामुलांना कपडाचोपडा करू. कणगीत शिगोशीग वर्षभर पुरेल असे धान्य भरून ठेवू.. आणि या आषाढीला पंढरीची वारी करून येऊ.

 महादूच नव्हे, सबंध घर ऊस शेतीमध्ये खपत होतं. काळजीपूर्वक निगराणी अखंड होती. रोज कुठे तण वाढते, यावर घारीप्रमाणे सर्वजण नजर ठेवून होते.

 त्या नजरेत अवध्या जगाचा क्रोध आणि हताशता दाटून आली, जेव्हा पाण्याची दुसरी पाळी तालुक्यात आलीच नाही. स्थानिक नेत्यांसोबत महादूही पदरमोड करून पाटबंधारे खात्याच्या ऑफिसमध्ये गेला, तेव्हा बेपर्वा उद्धट उत्तर मिळाले, ‘आम्हाला कारण माहीत नाही. वरून आदेश आला त्याप्रमाणे पाणी याच तालुक्यात दिलं गेलं. माणला उरलंच नाही.'

 'पण हा तर अन्याय झाला साहेब.' महादूला राहावले नाही. उग्र स्वरात तो पुढे म्हणाला, 'आधी कबूल करूनही पाणी सोडलं नाही. आम्हा सर्वांचा ऊस जळून गेला. प्रथमच तो आम्ही लावला. त्यासाठी पाणीपट्टीकरिता बँकेचे कर्ज काढले आणि आता म्हणता, वरचा आदेश आला म्हणून पाणी माणला सोडलं नाही. आमचं केवढं नुकसान झालं माहीत आहे?'


पाणी • चोर / १३