पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/150

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


रेशनचं धान्य मिळत नाही... आणि आठ दिवसांनी हे काम संपणार, तेव्हा दुसरं काम लवकर उपलब्ध व्हावं...मस्टर असिस्टंट अरेरावी करतो इ. तहसीलदार त्यांचं समाधान करायचा प्रयत्न करतात व जीपकडे वळतात.

 ‘प्रदीप...' पाटील जीपमध्ये बोलू लागतात, 'रोजगार हमीच्या कामावर उशिरा येणं हे आम आहे, अनेकांना दुरून यावं लागतं हे खरं असलं तरी नियम तो नियम. म्हणून मी हजेरी घेऊन मस्टर क्लोज केलं. आता उशिरानं जे मजूर येणार, ते माझ्या नावानं बोंब मारणार... मजुरी कमी पडते... कारण इथं कठीण काम आहे व दुष्काळानं व निकृष्ट हायब्रीडच्या भाकरीच्या जेवणानं ताकद कुठे आहे माणसात ? पुन्हा श्रमाची वृत्तीही नाही. मजुरी कमी पडली की पुन्हा टीका, वृत्तपत्रात बातमी... आम्हाला पुन्हा चौकशी करावी लागते. किमान वेतन देणं भाग आहे, पण त्या प्रमाणात काम झालं नाही की, कामाचा खर्च वाढतो व मंजूर रक्कम संपली की काम बंद पडतं. मग उर्वरित कामासाठी पुन्हा रिव्हाईज एस्टिमेट करा.. ते मंजूर करा आलंच.. पण या अडचणी समजून न घेता टीका होतेच. आता हे काम संपत आलंय. - या परिसरात दुसरं काम मंजूर आहे; पण एका शेतक-यानं काम अडवलंय. त्याची संमती नसेल तर काम सुरू होऊ शकत नाही.'

 ‘मग ?-

 ‘आता गावात गेल्यावर त्याच्याशी चर्चा करायची. बघूया संमती मिळते का?'

 प्रदीपच्या शहरी मनःपटलावर तहसीलदार म्हणजे तालुक्याचा राजा असे बिंबलेलं होतं; पण या राजाला काय काय करावं लागतं हे तो प्रथमच जवळून अनुभवत होता.

 गावात गेल्यावर नेहमीप्रमाणे सरपंच - पोलिस पाटील आले. चहापाणी झालं. पाझर तलावासाठी संमती न दिलेल्या शेतक-याला बोलवून घेतलं. त्याला समजावून सांगितलं. प्रदीप पाहात होता. तहसीलदार पाटील त्याला तळमळीन समजावीत होते. मधेच हुकमी आवाजात धमकावीत होते, पण तो शेतकरीही तेवढाच ठाम होता.

  नाही साहेब - म्या जिमीन आडव्हान्स मिळाल्याबिगर देणार नाही. - मह्या पोरीचं लगीन रुकलंय पैशाअभावी.. म्या जिमीन दिली तर पैसा नाही मिळणार बगा बिगीनं....!”

पाणी! पाणी!! / १४८