पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/148

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 तहसीलदारांचा अभ्यास व अनुभव त्यांच्या बोलण्यातून प्रदीपला जाणवत होता. एक समधर्मी भेटल्याचं समाधान होतं. मग त्यांच्या गप्पा सबंध दौ-यात रंगत गेल्या.

 जे त्यांनी पाहिलं, जे त्यांना दाखवण्यात आलं, त्यातून दुष्काळ जाणवत होता; पण त्याहीपेक्षा कुठेतरी मालकमंत्र्यांची महती ठसविण्यासाठी हा दौरा आयोजित केला आहे असं जाणवत होतं. त्यांनी किती योजना खेचून आणल्या, किती पैसे खर्च झाले व किती फायदा झाला, हे अधिकारी व पालकमंत्र्याचे दौ-यात सामील झालेले कार्यकर्ते पुनःपुन्हा ठासून सांगत होते. हा सारा पूर्वनियोजित दौरा असल्यामुळे प्रदीपला असंही वाटलं की, प्रत्येक कामाच्या जागी व गावी आधी पढवलेली व माहिती दिलेली गावकरी मंडळी उपस्थित ठेवली गेली होती. व त्यांच्या उत्तरातून पालकमंत्र्यांची प्रतिमा उजळ करण्याचा एक प्रयत्न होता.

 तहसीलदारानं त्याला स्पष्टपणे सांगितलं होतं, 'तुम्हा मुंबईच्या सॉफिस्टिकेटेड पत्रकारांना मंत्री वगैरे मराठी सिनेमात दाखवल्या जाणा-या सरपंच - पाटील टाईप वाटतात; पण हा भ्रम आहे. माझा अनुभव तर असा आहे, की बरेच मंत्री हे अतिशय चाणाक्ष व जनमानसाची नाडी गवसलेले असतात. पण आपलं दुर्दैव असं की, साऱ्याच गोष्टी शासनानं करायच्या असा शिरस्ता रूढ झाल्यामुळे व भ्रष्टाचार - लालफितीच्या कारभारामुळे चांगल्या योजनांचा फज्जा उडतो. याबाबत तुम्ही शहरी लोक पुढारी - मंत्र्यांना दोष देता, ते चुकीचे आहे. ही कलेक्टिव्ह रिसपॉन्सिबिलिटी आहे, ती कोणीच पार पाडत नाही.'

 रात्री तहसीलदारांनी त्याला त्यांच्या घरी जेवायला बोलावलं होतं. प्रदीपला ब-याच दिवसांनी अस्सल कोल्हापुरी जेवणाचा योग लाभला होता.

 दौरा ठीक झाला; पण माझं समाधान नाही. पाटील, हा दौरा त्यांनी ठरविलेला सिलेक्टिव्ह गावांचा व कामाचा होता. मला यापलीकडे काहीतरी हवं आहे.'

 'तसं असेल तर उद्या माझ्याबरोबर चल. मी तुला खरा दुष्काळ व त्याची भीषणता - व्यापकता दाखवीन.' पाटील म्हणाले, 'पण उद्या तुमचा वेरुळ - पैठण व परवा अजिंठा असा दौरा आहे... जंगी बेत आहे.. तो कशाला सोडतोस?'

 'नाही यार, हे सारं पाहिल्यानंतर आपण पंचतारांकित हॉटेलमध्ये राहाणं व साईट सीइंग करणं प्रशस्त वाटत नाही.'

 'अजून तुझी ती कॉलेजच्या जमान्यातली स्वप्नाळू वृत्ती व संवेदनशीलता कायम आहे म्हणायची !' तहसीलदार म्हणाले, 'पण पेशंटचं दुःख पाहून डॉक्टर सीरियस झाला तर तो पेशंटला नीट करू शकणार नाही, हे विसरू नकोस. हां,

पाणी! पाणी!! / १४६