पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/147

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


एकत्र होतो... पण बारावीनंतर मी कृषी महाविद्यालयात पुण्याला गेलो व आपला संपर्कच तुटला...!'

 प्रदीपला आता ओळख पटली. 'अरे पाटील ! मला कालपासून तुझा चेहरा ओळखीचा वाटत होता; पण रिकलेक्ट होत नव्हतं बध. एनी वे फार आनंद झाला बघ तुला भेटून. तू इथं या क्षेत्रात कसा?'

 ‘बी. एस्सी. (अॅग्रि.) केल्यानंतर दोन वर्षे घरी शेती केली; पण आधीच शेतीवर दोन मोठे भाऊ होते. त्यांनाच पुरेसं काम नव्हतं, पुन्हा कोरडवाहू शेतीत नवीन काही करायला वाव तरी कुठे होता? म्हणून मग नोकरीचा प्रयत्न सुरू केला. एम. पी. एस. सी. पास झालो व एक - दीड वर्षापासून तहसीलदार आहे.'

 'फारच छान. तुझ्यासारखा सुशिक्षित व शेतीची माहिती असणारा तहसीलदार इथल्या लोकांना लाभला हे त्यांचं भाग्यच म्हणायला हवं !"

 'ते मला माहीत नाही. पण यार प्रदीप, मी प्रोफेशनल इथिक्स मानतो व सर्वस्वानं मला जे करता येईल ते करतो. या दुष्काळाचं म्हणशील तर मी शासनाची प्रत्येक योजना लालफितीचा अडथळा न येता कशी राबवता येईल हे पाहात आहे. किंबहुना मी सतत दौरे करून प्रत्यक्ष गावात जाऊन प्रॉब्लेम्स समजून घेतो व ते सोडवायचा प्रयत्न करतो.'

 तहसीलदार आता मोकळे झाले होते.

 'माझ्या तालुक्यातील प्रत्येक गावाची माहिती व तेथे दुष्काळाचा कसा असर पडला आहे, हे मला मुखोद्गत आहे...'

 "पण तुला असं वाटत नाही, हे सारं वरवरचं आहे ?”

 'निश्चितच नाही. यंदापण तीव्र दुष्काळ आहे; पण तो विकासाचा परिपाक आहे, असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही!

 ‘धिस साऊंड स्टेंज !'

 'मी एकच उदाहरण देऊन स्पष्ट करतो. अलीकडे दर वर्षी पाणीटंचाई जाणवते, हे आम चित्र आहे. याचं कारण आम्ही नळयोजना घेत नाही, धरणे बांधत नाही हे नसून पाण्याचा उपसा व वापर - तोही शेतीसाठी वाढला आहे हे आहे. अर्थात तो कॅश क्रॉपसाठी आहे, हे सत्य आहे व त्याचा फायदा मूठभर शेतक-यांनाच होतो, हेही तेवढंच सत्य आहे!"

दौरा