पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/14

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ऊस लावला होता, त्यांच्यापर्यंत पाण्याचा दुसरा हप्ता पोचलाच नाही. त्यांचा ऊस पाण्याअभावी कडक उन्हानं जळून गेला.

 हे असं कसं घडलं? का घडलं? राज्य सरकार आपलंच आहे, तर मग एक तालुका केवढा समृद्ध बनतो आणि दुसरा पिण्याच्या पाण्यालाही वंचित होतो. पाणी ही तर देवाची देणगी, मग एका तालुक्याला एवढं पाणी मिळतं, ज्यामुळे दुस-या तालुक्यात सर्वांची शेती करपून जावी? का? का म्हणून? त्या तालुक्याचा पाटबंधारे मंत्री आहे, तिथं साखर कारखाने आहेत, सहकारी बँकेचा राज्याचा अध्यक्षही इकड लाच आहे. म्हणून हे कट होतात. आम्हाला न्याय मग कधी मिळणार?

 महादू यंत्रवत काम करीत होता. झपाझप उभे पोसलेले उसाचे दांडे आडवे होत होते. काही मजूर मोळी बांधून ट्रकमध्ये चढवत होते. दुपारी भाकरी खायला शिदोऱ्या त्यांनी सोडल्या तेव्हा निम्मा वावर साफ झाला होता.

 महादूची भूक जणू आज मरून गेली होती. त्याला दोन तुकड्याहून जास्त खावंवलं नाही. तो हात धुऊन एका झाडाखाली निवांत बसला.

 त्याला २६ जानेवारीचा दिवस आठवत होता. त्या दिवशी माण तालुक्यात कालव्याचे काम पूर्ण झालं होतं आणि तिथं आज धरणाचं पाणी येणार होतं. ज्या नीरा नदीनं शेजारचा तालुका समृद्ध केला होता, ती आज आपलं अमृत या तृषार्त मातीस पाजणार होती.

 शुभ्र पाण्याचे लोट नाचत कालव्याद्वारे आले आणि सर्व लोकांनी आनंदाची जल्लोष केला. त्या पहिल्या पाण्याची पूजा केली, नारळ फोडला.

 सर्वांच्या चेह-यावर समृद्धीची-सुखाची स्वप्नछटा तरळत होती. महादूपण त्या असंख्यांतला एक होता.

 आज त्याच्या चेह-यावर पराभूत निराशा दाटून होती. त्या दिवशी फुलारून आलेले त्याचे शेतकरी बांधव आज त्याच्याप्रमाणेच हताश असणार. नव्हे, आहेतच.

 आपण ज्यांना निवडून दिले ते आपले आमदार - खासदार काय करत होते, जेव्हा तालुक्याचं पाणी अलीकडेच अडवलं व चोरलं? शेतकरी संघटनेनं त्यांच्या घरावर मोर्चा नेला, त्यात महादूपण होता. पण तेव्हाही त्याला वाटत होतं- आपले


पाणी! पाणी १२