पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/12

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 ट्रक सुसाट धावत होता आणि मनात असे कडवट विचार आल्यामुळे महादू कावला होता. तो ट्रकच्या बाहेर पचकन थुकला आणि समोरच्या रामजीला म्हणाला, ‘बिडी असेल तर काढ बाबा, लई तलफ आलीय.'

 'आपल्याला ही तलफ परवडणारी नाही महादू' रामजी म्हणाला, 'पण मी यातूनही मार्ग काढलाय त्यानं खिशातून एक मळकट पुरचुंडी काढली. ती सोडीत तो म्हणाला, 'कारखान्याच्या हफिसात साहेबलोक सिग्रेट ओढतात. त्यांची थोटकं पोरांना पाठवून मी गोळा करतो आणि तलफ आली की तीच ओढतो. चालेल तुला?'

 महादूसमोर रामजीनं सोडलेली पुरचुंडी धरली होती. त्यात अर्धवट ओढलेल्या सिग्रेटचे तुकडे होते. त्याला मळमळून आलं. तो मान फिरवीत म्हणाला, 'नको मला असं काही.'

 ‘याचा अर्थ अजूनही माझ्याइतकी वाईट परिस्थिती तुझी झालेली नाहीय, ठीक आहे.' रामजीनं एक थोटूक पेटवत आणि धूर काढीत गप्पा मारायच्या इराद्यानं विचारलं,

 'तू माण तालुक्याचा ना? कोणतं गाव तुझं?'

 ‘डंगीरवाडी. तिथं शेती हाय माझी. बारा एकर. पण पाणी नाही. वर्षभर पण उगवलेली बाजरी पुरत नाही. महादू पण मनातलं सांगू लागला... 'काय सांगू बाबा, आमचा तालुका लई कोरडा. हलक्या हलक्या जमिनी, पाणी कमी पडतं, बाजरीच काय ती होते. दस-यापर्यंत कसंतरी पुरतं. गावची मारुतीची जत्रा संपली की निघालोच इकडं कारखान्याला.'

 ‘आमच्या सांगोल्याची पण हीच परिस्थिती. आपले तालुके लागून लागूनच की, जिल्हा वेगळा असला तरी.'

 'होय, मी ऐकून आहे. आमच्या इंगीरवाडीच्या पोलीस पाटलांची बहीण तुमच्या तालुक्यातच दिलीय तळणीला बघा. मी पाटलासोबत गेलो होतो एकदा.' महादूचं मन मोकळे होत होतं. तो पुढे म्हणाला,

 'बहात्तरनंतर पुन्हा मागच्या वर्षीपासून दुष्काळ काटा काढतोय. गेल्या वर्षापाठोपाठ यंदापण पावसानं दगा दिला. काईसुदीक उगवून आलं नाही. दोन जनावरं


पाणी! पाणी!!! १०