पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/11

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 पण आज...

 त्याला पुन्हा घराला कुलूप लावून बैलगाडीत कुटुंबकबिला टाकून परत कारखान्यावर यावं लागलं होतं. यापुढील सहा महिने रोज नव्या गावी ट्रकबरोबर जायचं आणि कारखान्याच्या वतीनं शेतक-यांच्या उसाची तोड करायची व उसानं भरलेल्या ट्रकसह परत यायचं. मालकीण व थोरली लेक कारखान्यात रोजंदारीवर ऊसतोड करायची, तर धाकटी दोघं त्याच्यासोबत गावोगावी भटकायची. ऊसतोडीनंतर पाला गोळा करून आणायची. जनावरं जगवली पाहिजेत. बैलांना सोन्याचा भाव आहे. त्यांच्यासाठी वैरण नाही, पैसा नाही. शेती यंदाही पिकली नाही. लावलेला ऊस जळून गेला आणि बँकेचे कर्ज बोकांडी बसलं. त्याची फेड हा दूरचा प्रश्न राहिला. आधी स्वतः व बायकामुलं, जनावरं जगवायची कशी हा प्रश्न समोर उभा राहिला आणि गेल्या बारा - पंधरा वर्षांतला ठराविक मार्गच पुन्हा आपलासा करावा लागला. कारण जगणं भाग होतं आणि त्यासाठी पोटात भाकरीचे दोन घास हवे होते. कारखान्यावर ऊसतोडीच्या मजुरीखेरीज जगण्याचा दुसरा मार्ग महादूला ज्ञात नव्हता व करता येण्यासारखा तर नव्हताच नव्हता.

 एक साधं स्वप्न किती वर्षांपासून महादू पाहात होता. आपल्या गावात, तालुक्यात धरणाचं पाणी येईल व तृषित जमिनीत बागायत पीक डोलून उठेल... ऊस लावू आणि पैका ओढू... आपलं दैन्य व अभावाचं जिणं थोडंतरी सुसह्य होईल...

 आजही ते स्वप्न स्वप्नच राहिलं होतं.

 पण एका विषादानं मन कडवटलं होतं. आजवर आपल्या तालुक्यात पाणी असतानाही, त्याबद्दल निसर्गाला दोष देता येत होता. पण यंदा स्वप्न साकार न होऊ देणारी माणसं होती. ती कोण होती हे जेमतेम शिकलेल्या महादूला माहीत नव्हतं; पण ती बलदंड पुढारी व मस्तवाल अधिकारी मंडळी होती. हे शेतकरी असलेल्या त्याला चार लोकात ऊठबस करताना माहीत झालं होतं. पण त्यांना आपण शासन करू शकत नाही. किंबहुना त्यांच्यापर्यंत आपले हात, आपले शब्द व आक्रोश पोचणार नाही याचीही खात्री होती.

 हाती होतं एकच-अख्ख्या जगावर जळफळणं आणि स्वतःवर धुमसणं... ते व्यक्त करावयाचे प्रकारही सीमित व ठराविक होते - पचापचा धुंकणं आणि सहनच झालं नाही तर पोरांना बदडून काढणं.

पाणी - चोर / ९