पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/112

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 ‘छान जिरली पांडबा त्यांची. साले, आमास्नी हक्क असूनसुद्धा तिथं पानी भरू देत नाहीत. आता घ्या, आमची एक म्हातारी तिथं बुडून मेली!'

 ‘त्याचा काही उपेग नाही - पुन्यांदा, ते हीर सुद् करून घेतील बामनाच्या तंतर - मंतरनं-!'

 ‘ही चर्चा आता नको बाबा आधी म्हातारीला बाहेर काढून नीट पुरलं पाहिजे. त्याची व्यवस्था बघा!'

 ‘हो - आम्ही तिकडे जातो व प्रेत बाहेर काढतो, तोवर तुम्ही मर्तिकाची तयारी करा.'

 ‘आणि दफनभूमीत चांगला खड्डाही करून ठेवा...'

 ‘आजचा खाडा पडला मजुरीला नुकतंच काम सुरू झालं होतं नालाबंडिंगचं - मजुरी बुडाली.'

 ‘आसं म्हणून कसं चालेल बाबानू, जातीचे काम हाय. पुन्हा ती एकटीच. तिचं पोर - सून इथं हायत कुठं?'

 ‘त्येस्नी कळवाया हवं-'

 ‘पन त्येंचा पत्त्या कुनाकडं हाय? यवड्या मोठ्या औरंगाबादात कंच्या झोपडपट्टीत हायेत, ते एक बुद्धच जाने....

 ‘नाय नाय, मागच्या हप्त्यात आपल्या भीमरावाकडनं म्हातारीनं चिट्टी धाडली होती की... हा बगा भीमराव आला...'

 'होय तात्या, मीच चिट्ठी लिहिली होती. म्हातारीनं लेक - सुनेला गावाकडे बोलवल होतं. 'लवकर या' म्हणून मीच तिच्या आग्रहावरून लिहिलं होतं बघा...

 त्याचं बोलणं थांबलं ते एस. टी. च्या आवाजानं. त्यांच्या वस्तीजवळच बसचा स्टॉप होता. बस् फटफटत थांबली, धुराळा यांबला. बसमधून विहिरीत पडून मेलेल्या बायजेचे लेक - सून उतरत होते.

 'हे बेस झालं. आता ते पाहुन घेतील आपला रोजगार बुडाया नको.'

 ‘आणि खड्डा खणायचं पण नको... तिथं पार खडक आहे, बाप्पा खणायला लै त्रास होतो...'

 ‘चला कांबळयाकडं, लग्नाचा टाइम होतोय...'

 आणि दोन - तीन तरुण सोडता ते सारे पाहता पाहता पांगले गेले.

पाणी! पाणी!! / ११०