पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/111

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 ‘और हम मुसलमानों की पीर की जत्रा....!'

 ‘पाण्यासाठी वांधा.. मंडळी नुसतं ओरडत आहेत....'

 ‘ते बरोबरच आहे. या उन्हात सारखं पाणी प्यावं लागतं. ही अशी भीषण पाणीटंचाई...!

 ‘मोठ्या मुश्किलीनं मी टैंकर मंजूर करून आणला - त्यात हा अपशकुन...!'

 ‘आता चर्चा नको मंडळी... कुणाला तरी म्हारवाड्यात पाठवा. तिथल्या नौजवान गब्रू गड्यांना सांगावा धाडा. पंचायतीमध्ये मोठी सोल पडली आहे ती आणा. चला... चला...'

 थोडं पलीकडे काटेरी बाभळीच्या असलेल्या - नसलेल्या सावलीत बायकांचा घोळकाही आपसात बोलत होता.

 ‘पाटलीणकाकू काल तुमच्यामुळे रहाट मोडला. तिथूनच ती म्हातारी तडफडली बरं...।

 “येशे पोरे, कालच मी म्हणाले होते, तरुण जातीला असं बोलणं शोभत नाही. तुझ्यापेक्षा जुनी असून मी बरी. बिचारीला भाकरतुकडा देत असे. तू साधं काल पाणीही वाढलं नाहीस तिला'

 ‘ते जाऊ द्या हो, आला काय करायचं पाण्याचं ते बोला ना...'

 ‘लई आबाळ व्हतीया बया पाण्यावाचून कालबी पानी नव्हतं, आन् आज हे आसं झालं!'

 ‘माझ्या घरी नणंदबाई पोराबाळासह आलीया. काल पाण्याने भरलेलं रांजण त्येनी टकराटकरीत फोडून टाकलं बगा. निस्ता ठणाणा चाललाय घरी पाण्याच्या नावानं!'

 गावाकुसाबाहेर गावकोतवालाकडून कळलेली बातमी अन् पाठोपाठ माली पाटलांचा सांगावा येताच त्या झोपडपट्टीत कालवाकालव सुरू झाली. बायजा आपल्याच जातीजमातीची, पण जरा पल्याड राहाणारी म्हणून दुर्लक्षित झालेली. ती गावच्या विहिरीत - जिथं त्यांना पाणी भरू दिलं जात नव्हतं तिथं बुडून मेली, हे कळताच त्यांच्या प्रतिक्रियाही मोठ्या मासलेवाईक उमटल्या.

कंडम / १०९