पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/10

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सदस्याच्या खिशातून माचीस काढून ती पेटवली व भसाभसा चार - दोनदा धूर ओकला. छाती गरम होताच जीवाला तरतरी वाटली.

 आणि समोर लक्ष गेलं. लखुजी उभा होता. तोही ट्रकची वाट पाहात असावा. तोही ऊसतोडीला निघाला असावा.

 पुढे होऊन हाक मारावी असं महादूला वाटलं, पण ओठातून शब्द उमटण्यापूर्वीच त्याचा विचार बदलला. हा आपल्याला आता तो प्रश्न नक्की विचारणार, ज्याचं उत्तर काय द्यावं हे नक्की ठरत नव्हतं. म्हणून तो चेहरा फिरवून आपल्या वसरणीला जाणा-या एमएचक्यू १२७५ या ट्रकचा उस्मान ड्रायव्हर केव्हा येतो हे पाहात स्वस्थ राहिला.

 पण जरा वेळानं लखुजीचंच लक्ष गेलं, त्यानं मोठ्यानं हाक मारीत विचारलं ‘महादू, तू इथं?'

 'होय बाबा, मीच.' विषण्ण स्वरात महादू उत्तरला. लखुजीचा हा प्रश्न त्याला अपेक्षित होता. त्यामुळे नवल वाटलं नाही, तरी खेद वाटल्यावाचून राहिलं नाही.

 लखुजी त्याच्या जवळ येऊन सलगीची चौकशी करणार तोच उस्मान ड्रायव्हरची हाक आली, 'चलो महादू भाय, हम आ गये !'

 महादूला सुटकेच्या भावनेनं हायसं वाटलं. 'लखुजी मला गेलं पाहिजे, आधीच वेळ झालाय. ऊसतोड करून उद्या परतेन सायंकाळपर्यंत वसरणीहून तेव्हा भेटू. निवांत गप्पा मारू.' आणि घाईनं त्याचा निरोप घेऊन महादू ट्रकवर चढला. पोरं व इतर मजूर आधीच बसले होते. उस्माननं वसरणीला येणारे सर्व शेतमजूर ट्रकमध्ये बसल्याची ओरडून खात्री करून घेतली व ट्रक सुरू केला.

 महादू या वर्षी कारखान्यात ऊसतोडीसाठी येणार नव्हता, तर स्वतःचा ऊस कारखान्यात घालण्यासाठी ट्रकसोबत ऐटीत मिरवीत येणार होता. मागच्या वर्षी निरोप घेताना लखुजी व इतर जिवाभावाच्या मित्रांना त्यानं सांगितलं होतं, 'बाबांनो, आता आमची दैना संपली. पुढच्या वर्षी काही माझ्यावर ऊसतोड करायची पाळी येणार नाही. मी स्वतःचा ऊस घेऊन मालकाच्या ऐटीत येईन.'

 त्याच्या स्वरात ठाम विश्वास होता. चेह-यावर भावी सुखी आयुष्याचं गुलजार स्वप्न होतं. तो निःशंक होता.

पाणी - चोर / ८