पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/9

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे१. पाणी - चोर
 'अरे महादू, तू इथं?' लखुजीनं कपाळाचा घाम खांद्यावर टाकलेल्या पैरणीनं पुसत आश्चर्यानं विचारलं.
 ‘होय बाबा, मीच,' विषण्ण स्वरात महादू म्हणाला. लखुजीचा हा प्रश्न त्याला अपेक्षित होता. त्यामुळे नवल नाही वाटलं, पण खेद वाटायचा तो वाटल्यावाचून राहिला नाही.

 आज वसरणीचा ऊसतोडीसाठी नंबर होता. सकाळीच साखर कारखान्याभोवती पावसाळ्यात भूपृष्ठावर छत्राचं माळ उगवून पसरावं, तशा काडाच्या झोपड्या दाटून व खेटून उभ्या होत्या; त्यातून मार्ग काढीत कंत्राटदार माने येऊन महादूला वसरणीला जाण्यासाठी तयार राहण्याची सूचना देऊन गेले. झटपट त्यानं कारखान्यात बसवलेल्या सार्वजनिक नळावर स्नान केलं, बायकोनं भाजलेला भाकरतुकडा खाल्ला. दोन दिवसांची शिदोरी बांधून घेतली व आपली दोन पोरं घेऊन तो ठरलेल्या ठिकाणी वेळेवर हजर झाला. ऊस तोडल्यावर उरलेला पाला गोळा करण्यासाठी मुलांना सोबत घेतलं होतं. जनावरांना वैरण नाही, हा चारा तरी मिळावा हा उद्देश. बायको व थोरली वयात आलेली लेक कारखान्यातच रोजंदारीवर होत्या.

  वसरणीला जाणा-या ट्रकचा ड्रायव्हर उस्मान चहा-पाण्याला गेला होता. तोवर वेळ जाण्यासाठी कानावर खोचून ठेवलेली मजूर बिडी महादूनं काढली व

पाणी - चोर / ७