Jump to content

पान:पाणिपतची बखर.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(७) न करता खरोखर त्यात तत्कालीन समाजाचे मानचित्र कसे उमटले आहे या भूमिकेने केली तर बखरीतील ऐतिहासिकेतचा खरा अर्थ आपल्याला आकळेल. इतिहास संशोधक प्रा. शेजवलकर यांनी बखरीसंबंधी एक महत्त्वाचे विधान केले आहे ते या संदर्भात लक्षणीय वाटते. ' बखरीवरून इतर कांहीं कळत असो नसो, पण तत्कालीन समाजाच्या आशा-आकांक्षा, भावना व हर्षामर्ष यांचा बोध अवश्य होतो. ( पानिपत १७६१ पृ. १०२) बखरींतून आलेला पानिपतसंग्रामांतील तपशील किंवा शिवचरित्रांतील तपशील कितपत सत्य आहे यावर बखरीचे मोल ठरविण्यापेक्षां या संग्रामाकडे वा चरित्राकडे पाहण्याची जनमानसाची जी स्वाभिमानाची, गौरवाची भूमिका होती ती बखरींत कितपत प्रतिबिंबित झाली आहे, तसेच तत्कालीन वातावरणाचा प्रत्यय या बखरींतून कितपत येतो हे अजमावणेच अधिक श्रेयस्कर ठरेल. शिवशाही व पेशवेशाही या कालांत मराठी समाजाचे मन कोणत्या प्रेरणांनीं प्रभावित झाले होते. शौर्यं, स्वाभिमान, स्वामिनिष्ठा, देशप्रेम या गुणांच्या आविष्कारासाठीं ते कसे आसुसले होते, या गुणाचा गौरव करण्यांत ते कसे दंग झाले होते, याची साक्ष म्हणजे या कालातील बखरवाङमय होय. बखरीची कलात्मकता बखरीचा दुसरा पदर कलात्मकतेचा. आजच्या वाङमयीन दष्टीत अभ्यासाच्या या अंगालाच मोठे महत्त्व दिले जाते. बखरीचा विषय इतिहासावर आधारीत तर मांडणी कलात्मक असते हे आपण पाहिलेच. विषयाबद्दल बखरकाराला जो जिव्हाळा वाटतौ, वणित व्यक्ती वा प्रसंग याबद्दल जो अभिमान त्याच्या मनीं दाटतो, त्यामुळे वर्णनांत आपोआप जिवंतपणा, उत्कटता हे गुणविशेष अवतरतात. इतिहासातील व्यक्तींच्या बिकारविचाराशीं समरस होऊन बखरकार प्रसंग वर्णन करतो. यामुळे ललितकथेतील चित्रणाचा आगळा रंग बखरीत उतरू लागतो. रसाविष्कार, व्यक्तिचित्रण, मनोदर्शन, संवाद, वर्णनकौशल्य, निवेदनकौशल्य हे ललित कथेच्या लालित्याचे अंगभूत घटक बखरीत दृग्गोचर होऊ लागतात. खेरीज