पान:पाकिस्तानचे संकट.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४२ - पाकिस्तानचे संकटमा झुगारून दिली हा ऐतिहासिक प्रसंग जुना होता. ऑस्ट्रियाची सत्ता झुगारून देऊन इटलीने स्वातंत्र्य मिळविलें तो प्रसंग त्या मानाने अलीकडचा ! हे सर्व प्रसंग पारखून हिंदी देशभक्त त्यांच्यापासून स्फूर्ति व बोध मिळवीत होते. जपानच्या विजयाचाहि त्यांनी असाच उपयोग करून घेतला. रशियांतल्या झारशाहीला कंटाळलेल्या क्रांतिकारक देशभक्तांनी कोणते उद्योग चालविले होते, इकडेहि या देशभक्तांचे लक्ष होते. या . पं० श्यामजी कृष्णवर्मा हे काठेवाडी गृहस्थ यापूर्वीच इंग्लंडमध्ये जाऊन राहिले होते. १९०५ साली त्यांनी लंडनमध्ये इंडिया होमरूल सोसायटी काढली. 'इंडियन सोशिऑलॉजिस्ट' मासिक काढून त्यांनी इंग्लिश लोकमत जागृत करण्याला सुरुवात केली. १९०५ च्या अखेरीस या गृहस्थांनी असे जाहीर केलें कीं, युरोप-अमेरिका वगैरे देशांत जाऊन राजकीय चळवळ करण्याचें पूर्वशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या सहा लायक तरुणांना छात्रवृत्त्या देण्याचा त्यांचा संकल्प आहे. पॅरिसमध्ये राहणारे राणा नांवाचे हिंदी गृहस्थहि पंडितजींच्या या संकल्पाशी सहमत होते. सावरकर बंधूंपैकी विनायकराव यांनी या छात्रवृत्त्यांपैकी एक छात्रवृत्ति मिळविली व १९०६ साली जून महिन्यांत ते इंग्लंडला गेले. हिंदुस्थानचे भवितव्य ज्या लोकांच्या हातीं गेलें आहे त्या इंग्रजांच्या घरांतच हिंदी चळवळ घुसण्याची सोय अशा रीतीने झाली. वंगभंगाच्या चळवळीमुळे झालेल्या जागृतीचा फायदा घेऊन बारींद्रकुमार घोष यांनी बंगालभर क्रांतिप्रवण मनोवृत्तीच्या गुप्त संस्थांचे जाळे पसरून ठेविले होते. १९०७ च्या सुरुवातीला पंजाबमध्ये पुष्कळच अस्वस्थता उत्पन्न झाली होती. लाहोर-रावळपिंडी वगैरे काही ठिकाणी दंगेधोपे झाले व कांही प्रसंगी युरोपियन अधिकाऱ्यांचा उपमर्दहि करण्यांत आला. या गोष्टींमुळे गोंधळून जाऊन सरकारने लाला लजपतराय व अजितसिंह यांना हद्दपार केलें. ही गोष्ट नेमस्तांनाहि रुचली नाही. सरकारच्या या बेजबाबदारपणामुळे साऱ्या देशाला धक्का बसला आहे हे त्यांनी ओळखिलें व लालाजींच्या मुक्ततेविषयींचे प्रयत्नहि त्यांनी सुरू केले. पण, सर्वच लोकांची प्रवृत्ति

  • Life of Gopal Krishna Gokhale by the Rt. Hon. V. S. Srinivasa Sastri, p. 56..