पान:पाकिस्तानचे संकट.pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मुसलमानांच्या मागण्यांचा क्रमविकास - शुद्ध वृत्तिनिरपेक्षपणाने (objectively) विचार केला तर, लॉर्ड कर्झननें योजलेल्या अगर केलेल्या सर्वच गोष्टींना आज नांवें ठेवितां येणारहि नाहीत ! पोलिसखात्याची पुनर्घटना करण्यासाठी नेमण्यांत आलेलें कमिशन, प्लेगप्रतिबंधक उपायांची चौकशी करण्यासाठी नेमलेलें कमिशन, दुष्काळाच्या संकटाचा विचार करण्यासाठी नेमलेलें कमिशन इत्यादि गोष्टी वाईटच होत्या असें नाहीं; पण, परकीय शासनसंस्थेकडून केल्या जाणाऱ्या गोष्टींचा विचार करतांना त्या गोष्टींमागे असलेल्या वृत्तीचाच विचार प्रजेकडून प्राधान्ये करून केला जातो. 'अमृतमपि विषम् ' असा अनुभव यामुळे येतो. मग, जे विषच आहे तें प्रजेला किती जहरी वाटेल, हे काय सांगायला पाहिजे? वाढत्या शिक्षणामुळे देशांत उद्भवलेल्या नव्या चैतन्याला भिऊन, कर्झननें विद्यापीठांच्या कारभारांत सरकारी होयबांचा शिरकाव करण्याचा प्रयत्न केला; त्याबरोबर लोकमत जास्तच खवळले. स्थानिकस्वराज्यसंस्थांचे अधिकार संकुचित करण्याच्या कर्झनच्या प्रयत्नामुळेहि असंतोष वाढीस लागला. या असंतोषामुळे, बंगालमध्ये गुप्त संघटना करण्यांत व क्रांतिप्रवण मनोवृत्ति निर्माण करण्यांत अरविंद बाबूंचे बंधु बारींद्रकुमार घोष यांना कसे यश आले याची हकीकत सरकारी प्रतिवृत्तांतच देण्यात आलेली आहे.* रँड-आयर्स्टचा खून होऊन त्या प्रकरणाचा निकाल झाला; तरी चाफेकर प्रकरण महाराष्ट्रांत धुमसतच होतें. चाफेकर बंधूंची माहिती सरकारला पुरविणाऱ्या द्रविड बंधूंचा १८९९ च्या फेब्रुवारीत खून झाला. या प्रकरणी फरासखान्यांत चौकशी चालू असतां चाफेकर बंधूंपैकी धाकटे वासुदेवराव यांनी आगरख्यांत लपविलेले सहाबारी पिस्तूल काढून फौजदार रामजी पांडु व ब्रुइनसाहेब यांजवर झाडले. द्रविडबंधूंच्या खुनाचा पत्ता लागला; पण, झाडाच्या देठांतून देठ निघावे त्याप्रमाणे खुनांतून खून निघू लागल्यामुळे, इंग्रजी पत्रे कटाच्या कल्पनेचे घोडे नाचवू लागली. (केळकरकृत टिळकचरित्र : पूर्वार्ध : पृ. ६५६-६५७). मित्रमेळा वगैरे चळवळींच्या द्वारा नाशिक भागांत नवें चैतन्य निर्माण केल्यावर, सावरकर बंधंपैकी विनायकराव हे १९०१ साली पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये दाखल झाले होते. त्यांच्या प्रेरणेमुळे पुण्यातल्या व पुण्याबाहेरील मराठी मुलखांतल्या

  • Sedition Committee Report 1918, pp. 15–17.