पान:परिचय (Parichay).pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९८ । परिचय
 

असतात. काळे यांनी असे अनेक गैरसमज या ग्रंथात दूर केलेले आहेत.
 असा एक समज आहे की, मालोजी पूर्वी लखुजीच्या पदरी दरिद्री बारगीर होता. पण हे म्हणणे खरे ठरत नाही. शहाजी आणि जिजाई यांचे लग्न ज्या रम्य दंतकथेच्या आधारे वर्णन केले जाते ती दंतकथा इतिहासत: खोटी आहे. सरकारांच्या सारख्या फार मोठ्या इतिहासकारांचाही असा समज आहे की, जिजाबाई हिचे आयुष्य जवळजवळ परित्यक्तेचे होते. तुकाबाईशी लग्न केल्यानंतर जिजाबाईकडे शहाजीचे दुर्लक्ष होऊ लागले. पण हा समज इतिहासत: खोटा आहे. शहाजीचे तुकाबाईबरोबर लग्न इ. स. १६३० च्या आधी झाले. सरदेसाई यांच्या मते हे लग्न इ. स. १६२६ च्या सुमारास झाले. तर डॉ. बाळकृष्ण यांच्या मते हे लग्न इ. स. १६३० ला झाले. कसेही झाले तरी इ. स. १६४१ पर्यंत जिजाबाई शहाजीबरोबर संसार करीत होती. म्हणजे लग्नानंतर पहिली २० वर्षे दगदगीची असतील; पण ती परित्यक्ता नव्हती. सरदेसाई यांनासुद्धा तुकाबाई आणि जिजाबाई यांच्यातील सवतीमत्सर उल्लेखावा वाटतो. जो निराधार आहे. जिजाबाईचा वडील मुलगा शहाजीचा खूपच लाडका होता व तो शहाजीबरोबर असे. इ. स. १६५४ पर्यंत तो बापाबरोबर होता. त्या साली तो मेला. असाही एक समज आहे की, शिवाजी लहानपणापासून रामदास व तुकाराम यांच्या प्रभावामुळे प्रभावित झालेला होता. तुकाराम महाराजांचा मृत्यू इ. स. १६४९ च्या सुमाराचा आहे. त्यामुळे लोहगावच्या कीर्तनात तुकारामाच्या अभंगामुळे शिवाजीची बिनधोक सूटका झाली असाही समज आहे. शिवाजी आणि तुकाराम यांची भेट झाल्याचा काही पुरावा नाही. समर्थांच्या रामदासी पंथाचा स्वराज्याच्या उभारणीला फार मोठा उपयोग झाला अशी दूसरी समजत आहे. शिळेमध्ये सुरक्षित असणाऱ्या बेडकोळीचीही कथा सांगितली जाते. पण इ. स. १६७२ च्या आधी रामदास-शिवाजी यांची भेट झाल्याचा पुरावा नाही. असाही एक समज आहे की, दादोजी कोंडदेव आधी स्वराज्याच्या उभारणीला विरोधी होता. पण नेमके सत्य याच्या विरोधी आहे. पुढच्या गोष्टी सांगायच्या तर कैद झालेला शहाजी, शिवाजीने आदिलशाहीवर मोगलांकडून दडपण आणून सोडवला. शिवाजीने वाघनखाने अफजलखान मारला. तानाजीच्या आत्माहुतीमुळे कोंडाण्याचे नाव 'सिंहगड' झाले. बाजीप्रभू शिवाजीचा पाठलाग करणाऱ्या सैन्याकडून मारला गेला. शिवाजीने जावळीचे खोरे धोक्याने जिंकले. आगऱ्याहून पळाल्यानंतर शिवाजी वेष पालटून तीर्थयात्रा करीत दमादमाने रायगडला येऊन पोचला. असे शिवाजीविषयीचे अनेकविध प्रवाद आहेत. यांतील काही प्रवाद बखरकारांच्या स्वप्नरंजनातून निर्माण झालेले आहेत. तर इतर, आधुनिक राजकारणाचे रंग शिवचरित्रावर चढल्यामुळे निर्माण झालेले आहेत. हे सर्व गैरसमज बाजूला सारून शुद्ध इतिहास म्हणून शिवाजीचे दर्शन घेणे यासाठी