पान:परिचय (Parichay).pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

छत्रपती शिवाजी महाराज । ९९


काळे यांचा ग्रंथ आजतरी मराठीत एकुलता एक आहे.
 काही जणांना छत्रपतीच्या मोठेपणाचे समर्थन करताना अनेकविध बाबींचे समर्थन करावेसे वाटते. उदा. शिवाजीने जावळ खोरे इ. स. १६५६ मध्ये दगा देऊन घेतले. आज ही घटना आपण खोटी मानतो. पण सरदेसायांनी आणि सरकारांनी ही घटना खरी मानली आहे. ज्याने शिवाजीच्या सहवासात आयुष्याची १०|२० वर्षे काढली त्या सभासदाचेही 'जावळी दग्याने घेतली' असेच मत आहे. समजा, शिवाजीने जावळी दग्याने घेतली, तर शिवाजीचे समर्थन करण्याची गरज का वाटावी? ज्याला राज्य निर्माण करावयाचे आहे तो शत्रुला कोणत्यातरी मार्गाने पराभूत करणार. महंमद गझनीने जे अचानक छापे घातले त्याबद्दल गझनीला दोष देण्याचे अगर त्याचे समर्थन करण्याचे कारण नाही. त्या काळच्या युद्धतंत्राच्या त्या आवश्यक गरजा आहेत. ज्या मोजमापाने तुकारामाचे मोठेपण मोजले जाईल त्यापेक्षा शिवाजीला वेगळे निकष लावले पाहिजेत. राजकारणात विश्वासघात समर्थनीय आहे, असे माझे मत नाही. नीतिमूल्ये राजकारणात अप्रमाण मानावीत, असे मला वाटत नाही. पण या माझ्या मताची पार्श्वभूमी लोकशाहीच्या संदर्भात निर्माण होते. शिवाजीने लोकशाही निर्माण केली नाही. तो निवडणुकीच्या मार्गाने प्रस्थापित झालेल्या लोकशाही विरुद्ध लढत नव्हता. विश्वासघात आणि खून यांनी परिपूर्ण असणाऱ्या लष्करी एकतंत्री राजवटीच्या संदर्भात शिवाजीचे मूल्यमापन केले पाहिजे. शिवाजीच्या जीवनात दग्याफटक्याचे प्रसंग आहेत काय, हा मुद्दा गौण असून शिवाजीच्या राजकारणाने खुनी राजकारणाला जन्म दिला, की सुस्थिर राजवटीला जन्म दिला हा मुद्दा महत्त्वाचा आहे. शिवाजी अनियंत्रित राजा होता हे उघड सत्य आहे. त्याने महाराष्ट्रात जे राज्य निर्माण केले त्यामुळे जनतेची शक्ती आणि कर्तृत्व वाढले की कमी झाले हा मुद्दा महत्त्वाचा आहे. शिवाजी शेवटी लष्कराश्रयी नेता होता. पण जी राजवट त्याने निर्माण केली तिचा पाया. मुलकीसत्ता लष्करीसत्तेपेक्षा बलवान करणारा होता हा मुद्दा महत्त्वाचा आहे. हे सारे सोडून देऊन भलती समर्थने करण्याचे कारण नाही. शिवाजीने अफजलखानाला मारले. आधी दगा कुणी दिला, याची चर्चा निरर्थक आहे. समजा, शिवाजीने अफजुलखानासारख्या पवित्र, सज्जन, पापभीरू, सदय, शांततावादी माणसाला हेतपुरःसर दगा दिला असला तरी बिघडले कुठे ? या मुद्दयावर शिवाजीचे मोठेपण ठरणार नाही. ज्यांनी जीवनात कुणाला दगाफटका दिला नाही अशी माणसे महाराष्ट्रात पुष्कळ आहेत. पण शिवाजीला आम्ही महाराष्ट्राचे प्रतीक मानतो या 'नाकाच्या नीट' वागणाऱ्या माणसांना विसरून जातो. शिवाजीचे मोठेपण दगा देणे अगर न देणे यात नाही, तह पाळणे अगर मोडणे यात नाही. तेव्हा अशा सर्व ठिकाणी समर्थने देण्याचा मोह आवरला पाहिजे. काळे यांना पुष्कळदा हा मोह