पान:परिचय (Parichay).pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

छत्रपती शिवाजी महाराज । ९७

फार मोठा ठसा आहे. शिवाय या विषयाचा त्यांचा व्यासंग मोठा असल्यामुळे त्यांना मुल्यमापनाची 'खाज' असणे अगदी स्वाभाविक आहे. पण हा ग्रंथ अतिशय संयमाने रेखलेला असा उतरला आहे. विश्वसनीय पुराव्यांच्या आधारे छत्रपतींचे जे चरित्र निश्चित ठरेल ते व्यवस्थित रीतीने रेखाटणे हा या ग्रंथाचा उद्देश आहे. यामुळे विवेचनाचा मोह त्यांना टाळावा लागला. मूल्यमापनाचा वादग्रस्त भाग त्यांनी शक्यतो संक्षेपिला व आपले राजकारण ग्रंथात पाझरू दिले नाही. मर्यादा ठरवून घ्यावयाची व ती निग्रहाने पाळावयाची याचा काळे यांनी चांगला आदर्श घालून दिला आहे. त्यांनी पुराव्याची चर्चा व मतमतांतरांची चर्चा टाकून अधिकृत शिवाजीचे चरित्र कोणताही स्वकालीन रंग येऊ न देता रेखाटले याबद्दल ते धन्यवादास पात्र आहेत.
 असे चरित्र रेखाटावयाचे म्हणजे लोकमान्य अशा अनेक समजुती भ्रम म्हणून सोडून द्याव्या लागतात. काळे यांच्या शब्दांत सांगावयाचे म्हणजे बहु ' श्रुत' वाचकाच्या विरसाला कारणीभूत व्हावयाचे. काळे यांनी कटाक्षाने या बहुश्रुत वाचकांचा विचार टाळला आहे. शिवचरित्र निबंधावली आणि मूळ ऐतिहासिक साधने अभ्यासिणे इतका ज्यांचा आवाका आहे त्यांच्यासाठी सदर ग्रंथ नाही. त्यांनी पोतदार आणि शेजवलकर यांच्या संभवनीय बृहद्ग्रंथाची वाट पाहावयाला पाहिजे. ज्यांना मूल्यमापनाची अधिक जिज्ञासा आहे त्यांनी हा ग्रंथ वाचण्याची आवश्यकता नाही. कारण ती या ग्रंथाची प्रतिज्ञा नव्हे. शिवाजीच्या चरित्रातील शंभर टक्के विश्वसनीय पुराव्यांनी सिद्ध होणाऱ्या घटना कालानुक्रमे वाचण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा ग्रंथ आहे. ही या ग्रंथाची प्रतिज्ञा आहे व ती शंभरटक्के पूर्ण झालेली आहे. सभासद पुनःपुन्हा शिवाजीच्या अंगी कुलदेवता भवानीचा संचार होत असल्याचे सांगतो. असे अद्भुताचे रंग इतिहासाला मान्य नाहीत. तद्वत् या देवतेच्या आश्वासनापर्यंत वाट पाहण्याइतका देवभोळेपणासुद्धा इतिहासाला मान्य नाही. आजचा कुणीही चरित्रकार या बाबतीत नाव काढणार नाही. दैवी चमत्कारातून आम्ही इतिहास वर उचलला आहे. पण रम्य स्वप्नरंजनातून इतिहास बाहेर पडतोच असे नाही. लखुजीच्या मांडीवर बसलेले परस्परांच्यावर गुलाल उधळणारे शहाजी-जिजाबाई आम्हाला संभवनीय वाटतात. हा प्रकार ऐतिहासिक दृष्टीने सत्य असावा असे सरदेसाई यांना १९३५ पर्यंत वाटत होते. पण रम्यतेचे हे रंग इतिहासाला मान्य नाहीत. गरोदर जिजाबाई आपल्या नवऱ्याबरोबर घोड्यावरून पुढे पळते आहे, तिचा प्रत्यक्ष बाप पाठलाग करीत पाठीमागून येतो आहे, शेवटी लखुजीला दिवस भरलेली आपली मुलगी शिवनेरीवर पोचती करावी लागते व चरित्रनायक शिवाजीचा जन्म होतो. असल्या प्रकारचे नाटय इतिहासाला मान्य नाही. शुद्ध इतिहासातून नाटयाचे हे सर्व रंग गळालेले