पान:परिचय (Parichay).pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चक्रपाणि । ५९

प्रश्न आहे. पण एकदा सर्वश्रेष्ठ रसाची कल्पना आपण मान्य केली, तर भक्तिरसप्रधान वाङ्मयाशिवाय दुसरे कोणते वाङ्मय साहित्यिकांना निर्माण करावेसे वाटेल काय, याचाही आपण विचार करायला हवा. प्राचीन मराठी वाङ्मयात जे संत नव्हते, त्यांनीही भक्तिरसप्रधान काव्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. पंडित कवींनीही हेच काव्यशास्त्र मान्य केले आहे.
 एक प्रश्न असाही आहे की, तेराव्या शतकातील मराठीने आणि मराठी वाङ्मयाने अपभ्रंशाशी सांधा तोडलेला आहे. मराठी वाङ्मय सातत्याने आपला संबंध संस्कृतशी जोडीत आलेले आहे. अपभ्रंशातील काव्यपरंपरांचा मराठी काव्यपरंपरेशी संबंध मुद्दाम शोधून पाहावा लागतो. हा जो अपभ्रंशाशी सांधा तोडण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न दिसतो, याचे कारण अकराव्या-बाराव्या शतकांत वैदिक धर्माभिमान्यांना सातत्याने जैन प्रभावाशी करावा लागलेला संघर्ष हे असेल काय, त्याचाही शोध घ्यायला पाहिजे. आणि तरीही हा सांधा पूर्णपणे तुटत नसतो. म्हणून ऐन तेराव्या शतकात वाङ्मयाचा आरंभ होतानाच जे कमालीचे अलंकार-प्राधान्य दिसते, तो अपभ्रंश वाङ्मयपरंपरेचा अवशेष असेल काय, असाही प्रश्न एकदा विचारून पाहावा लागतो.
 ढेरे यांनी ज्या प्रश्नांची चर्चा केलेली नाही, ते आपण बाजूला ठेवले, तरी ज्या प्रश्नांची चर्चा त्यांनी केलेली आहे, तीसुद्धा सर्वांनाच जशीच्या तशी मान्य होईल असे नाही. उदाहरणार्थ, त्यांनी पृष्ठ ६१ वर ओवीप्रबंध म्हणजे ओवीछंदात केलेली गानयोग्य रचना, असे आपले मत नोंदविलेले आहे. ओवी हा गेय छंद होता, यात वाद नाही. ओवी गायिली जात असे, यातही वाद नाही. जे गायनयोग्य प्रबंध गेय ओवीत असत, त्यांना ओवीप्रबंध म्हटले जाई, हेही आपण मान्य करू. तरीही गेय ओवीखेरीज वेगळी अशी ग्रांथिक ओवी आहे. ही ग्रांथिक ओवी गायिली जात नसे. ही जी ग्रांथिक ओवी हिचे मराठीत स्थान संस्कृतातील अनुष्टभ वृत्तासारखे आहे. संस्कृतमध्ये ज्याप्रमाणे अनुष्टुभ वृत्त गायिलेही जाते, शिवाय सर्व तत्त्वज्ञानविवेचन, व्याख्यान, प्रवचन यांच्यासाठी वापरले जाते, तसे मराठीतील ओवीचे आहे. ही मराठी ओवी ग्रंथरचनेसाठी जेव्हा वापरली जाते, तेव्हा ओवी छंदातील ग्रंथ या अर्थाने ओवीप्रबंध निर्माण होतो. ज्ञानेश्वरांनी, आपले श्वासोच्छवाससद्धा प्रबंध व्हावेत, असा उल्लेख केला आहे तो, गानयोग्य व्हावेत या अर्थाचा नसून, चिंतनयुक्त व्हावेत, या अर्थाचा आहे. म्हणून ओवीप्रबंध या शब्दाचा जसा एक अर्थ गेय ओवीचा गीतप्रकार व त्याची रचना हा होतो, तसा दुसरा अर्थ ग्रांथिक ओवीतील वैचारिक रचना, असाही होतो. षट्स्थलात विसोबांनी जो ओवीप्रबंधाचा उल्लेख केलेला आहे, तो या दुसऱ्या अर्थाने आपणाला गृहीत धरावा लागतो.
 चांगा वटेश्वरांनी आपला ' तत्त्वसार' हा ग्रंथ शके १२३४ ला हरिश्चंद्र-