पान:परिचय (Parichay).pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

६० । परिचय

गडावर रचून पूर्ण केला. ही घटना ज्ञानेश्वरीच्या रचनेनंतर सुमारे बावीस वर्षांनी घडलेली आहे. 'चांगदेवपासष्टी ' हा ग्रंथ ज्ञानेश्वरीनंतरचा आहे. म्हणून ज्ञानेश्वर व चांगदेव यांचा संबंध याहीपूर्वीचा गृहीत धरणे भाग आहे. 'तत्त्वसार' या ग्रंथाच्या पूर्वी चांगदेव वारकरी संप्रदायात समाविष्ट झालेले असणे अपरिहार्य आहे. कारण 'तत्त्वसार' या ग्रंथाच्या पूर्वीच ज्ञानेश्वरांनी समाधी घेतलेली आहे. चांगदेव, मुक्ताबाई यांचा संबंध आणि मुक्ताबाईने इहलोक सोडून जाणे, ही घटनाही घडलेली आहे. तेव्हा ज्ञानेश्वर आदी भावंडे यांच्या सहवासात आल्यानंतर व ती निधन पावल्यानंतर अनेक वर्षांनी 'तत्त्वसार' हा ग्रंथ लिहिला गेला, असे मानणे भाग आहे. तत्त्वसारकर्ता चांगा वटेश्वर याचा शिष्य रामकृष्णनाथ आणि रामकृष्णनाथाचा शिष्य विसोबा खेचर आहेत. तेव्हा विसोबा खेचरांची ग्रंथरचना ही आपल्याला तत्त्वसारानंतर गृहीत धरणे भाग आहे. अडचण अशी आहे की, विसोबा खेचरांनी शके १२३१ मध्ये आळंदी येथे समाधीचा स्वीकार केला, हे मत ढेरे यांनी मान्य केले आहे (पृष्ठ ७०). विसोबांचा मृत्यू जर शके १२३१ चा मान्य करायचा, तर मग 'षट्स्थल' या ग्रंथाची रचना त्यापूर्वीची गृहीत धरावी लागेल. म्हणजे तत्त्वसार या ग्रंथाच्या पूर्वी पाच-सात वर्षे तरी निदान षट्स्थल हा ग्रंथ लिहिला गेला, असे मानावे लागेल. हे मानण्यात अनेक अडचणी आहेत. ढेरे यांनी चांगा वटेश्वर, चांगदेव राऊळ आणि चक्रधरस्वामी या तीन भिन्न नावांनी वावरणारी व्यक्ती एकच आहे, असे जर उद्या आढळून आले, तर मला आश्चर्याचा धक्का बसणार नाही, असे मत नोंदविलेले आहे (पृष्ठ ३१२).
 मलाही स्वतःला विश्वसनीय पुराव्यावर उद्या चांगदेव राऊळ, चांगा वटेश्वर आणि चक्रधर या तीन नावांनी वावरणारी व्यक्ती एकच आहे, असे आढळून आले, तर धक्का बसणार नाही. कारण विश्वसनीय पुराव्याने एखादी गोष्ट जर सिद्ध होत असेल, तर ती आपल्या इच्छेला कितीही गैरसोयीची ठरो, आपण ती मान्य केली पाहिजे. माझी अडचण निराळी आहे : जर तीन नावांनी वावरणारी व्यक्ती एक असेल, तर या व्यक्तीचा शेवटचा कालखंड चक्रधर या नावाने वावरण्यात व्यतीत होतो आणि हा कालखंड शके १२३४ च्या नंतर म्हणजे ज्ञानेश्वरांच्या निधनानंतर येतो. चक्रधरस्वामी ज्ञानेश्वरोत्तर काळात होऊन गेले, असे जर मानायचे असेल, तर आपल्याला महानुभावीय ग्रंथांतील सगळीच कालगणना आमूलाग्र बदलून टाकावी लागेल. कोणतीही कालगणना बदलून टाकण्यास माझी हरकत नाही, पण त्यासाठी सबल पुरावा हवा. अजून असा सबल पुरावा उपलब्ध झालेला नाही.
 माझ्या म्हणण्याचा अर्थ ढेरे यांचे संशोधन चूक आहे असा नसून, मला असे म्हणायचे आहे की, विसोबा खेचरांच्याबाबत काळ नोंदवण्यात किंवा इतरांनी