पान:परिचय (Parichay).pdf/58

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

५८ । परिचय

मी जाता जाता नोंदवतो. शांत रस संस्कृत काव्यशास्त्रात क्रमाने महत्त्वाला चढत असलेला दिसतो. अभिनवगुप्तांनी शांतरसाला सर्वांत मधुर आणि सर्वश्रेष्ठ अशा महारसाचे स्थान दिलेले आहे. ज्याच्यात सर्व रस सामावले जातात, ज्या रसात अंतिमत: सर्व रस विलीन होतात आणि ज्यातून सारे रस निर्माण होतात, असा शांत हा महारस आहे, ही अभिनवगुप्तांची भूमिका आहे. अभिनवगुप्त या शांतरसाचा स्थायीभाव तत्त्वज्ञान असे मानतात. अभिनवगुप्तांच्या या काव्यशास्त्रीय भूमिकेमुळे तत्त्वज्ञान-विवेचनाचा ग्रंथ केवळ काव्यग्रंथ असण्याची शक्यता नव्हे, तर सर्वश्रेष्ठ काव्यग्रंथ होण्याची शक्यता निर्माण होते. या काव्यशास्त्रीय भूमिकेचा ज्ञानेश्वरांशी संबंध आपण जोडलाच पाहिजे. त्याशिवाय तत्त्वज्ञानग्रंथ असल्यामुळेच ज्ञानेश्वरी श्रेष्ठ काव्यग्रंथ झाली, ही भूमिका आपल्याला नीट सांगता येणार नाही. परतत्त्वस्पर्श असणारे रसिकग्रंथ हेच श्रेष्ठ काव्यग्रंथ होत, ही भूमिका नुसती ज्ञानेश्वरीत नाही. ही भूमिका विसोबा खेचरांनाही गृहीत आहे. तेही आपला षटस्थलग्रंथ काव्यग्रंथ आहे आणि त्याच वेळी तत्त्वविवेचनाचा ग्रंथ आहे, असे गृहीत धरून चाललेले आहेत. सरस्वती सप्तस्वराने मिरवते, ती स्वरांना अलंकारांचे रूप देते, ती रंग शोभिवंत करते, या सरस्वतीच्या प्रसादामुळे आम्ही कवित्व अंगीकारतो आहोत, असे विसोबा म्हणतात. विसोबांना आपले तत्त्वज्ञान हा साहित्यसंबंध आहे, गुरुकृपेने परब्रह्म सुरस होते, असे वाटते. ते स्वत:च्या ग्रंथाला ओवीप्रबंधच म्हणतात. रामदासस्वामींनी कवित्वाचे धीट, पाठ, धीटपाठ आणि प्रासादिक असे चार प्रकार केलेले आहेत. रामदासांचीही समजूत तत्त्वज्ञानविवेचन करताना आपण काव्य सांगतो आहोत, हीच आहे. रामदासांच्या या विभागणीला जुनी परंपरा दिसते. कारण धीटपाठ या काव्यप्रकाराचा उल्लेख विसोबांनी केलेला आहे (ओवी १७८ व २०४). अभिनवगुप्ताच्या काव्यशास्त्राचा ज्ञानेश्वरांमुळे मराठी तत्त्वविवेचनपर ग्रंथांवर झालेला परिणाम अभ्यासाचा विषय नाही का?
 अद्वैती, निर्गुणोपासक शैवांचा शांत रस मोक्षोपयोगी आहे. तो मोक्षोपयोगी असल्यामुळे सर्वश्रेष्ठ रस आहे. भक्तिमार्गीय वैष्णव कवींनी नेमकी हीच भूमिका आपल्या तत्त्वज्ञानाला सुसंगत अशी केली. भक्तिमार्गीय वैष्णव कवींचे म्हणणे असे की, परमेश्वराची भक्ती ही मोक्षाला उपयोगी आहे. म्हणून या भक्तिभावनेतून जन्माला आलेले जे वाङ्मय त्याचा स्वतंत्र भक्तिरस मानायला हवा. या भक्तिरसाचा आविष्कार करणारे वाङमय सर्वश्रेष्ठ रसाचे वाङमय मानायला हवे. भक्तिरस या कल्पनेच्या मांडणीत महाराष्ट्रातील बोपदेव हा महत्त्वाचा विचारवंत आहे. हा काव्यविचार आणि नामदेवांपासून सुरू होणारा अभंगातील भक्तिरस यांचा परस्परांशी संबंध हा शांतरस व ज्ञानेश्वरी यांच्या संबंधासारखाच आहे. खरोखरच आपण वाङ्मयीन भूमिकेवरून एखादा रस श्रेष्ठ मानू शकतो काय, हा एक निराळा