पान:परिचय (Parichay).pdf/57

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

चक्रपाणि । ५७

देतो. एकेक भूमिका क्रमाने लोकमानसात रुजते आणि बद्धमूल होते, याची कारणे आपण सांगितली पाहिजेत. वारकरी तोंडाने कितीही श्रुति-स्मृति-प्रामाण्य सांगोत, परंपरेच्या कर्मठांना ते आपले विरोधकच वाटले, म्हणूनच त्यांचा छळ झालेला आहे. महानुभाव काय आणि वारकरी काय दोघेही रूढ परंपरेचे विरोधक होते. त्यांपैकी बहुजनसमाज वारकऱ्यांच्या मागे गेला. दलितही प्रामुख्याने वारकऱ्यांच्या मागे गेले. त्यांनी महाराष्ट्र जिंकला. वारकऱ्यांचा विजय महाराष्ट्रात इतका गाढ आहे की, देवीच्या देवळातही भजन वारकऱ्यांचेच चालू असते. वस्तुत: वारकरी हे देवीचे उपासक नव्हते. औसा येथे (जिल्हा उस्मानाबाद) वारकऱ्यांचा एक मठ आहे. या मठाचे मठाधिपती लिंगायत आहेत. त्यांचे बेटीव्यवहार लिंगायतांशी होतात. घरचे कुलाचार लिंगायत परंपरेने होतात. अंत्यक्रिया आणि विवाह लिंगायत पद्धतीने होतो. पण त्यांची मोक्ष उपासना वारकरी आहे. तेराव्या शतकात वारकऱ्यांच्या मागे बहुजनसमाज का गेला, महानुभावांच्या मागे ब्राह्मण पंडित का गेले, हाही एक कूट प्रश्न आहे. ढेरे यांनी तो चर्चिलेला नाही.
 डॉ. ढेरे यांनी कशाकशाची चर्चा केलेली नाही, याचा मी मुद्दाम उल्लेख करीत आहे. तेराव्या शतकातील वाङमयीन व सांस्कृतिक जीवनाविषयी जे जे सांगता येणे शक्य आहे, ते सर्व आपण सांगितले आहे, असा ढेरे यांचा दावाही नाही. ढेरे यांनाच काय, पण कोणत्याही मर्त्य मानवाला सांगता येण्याजोगे सगळे सांगून टाकता येईल, हे शक्यही नाही. एका ग्रंथात तर सगळे सांगणे शक्य नसतेच, पण एका व्यक्तीला अनेक ग्रंथांत, किंबहुना एका पिढीनेही जरी ठरवले तरी शेकडो ग्रंथांत मिळून सगळे सांगता येणे शक्य नसते, याची मला जाणीव आहे. संशोधनाच्या क्षेत्रात सांगायचे तितके सगळे सांगून संपलेले आहे, अशी वेळ कधी येतच नाही. तरीही ढेरे यांनी कशाकशाची चर्चा केलेली नाही, याचा मी मुद्दाम उल्लेख केलेला आहे. कारण ढेऱ्यांच्या संशोधनामुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे संशोधनाच्या ज्या दिशा निर्माण होत आहेत, त्यांचा विचार यापुढे संशोधकांना करावा लागणार आहे. तो करीत असताना कोणते प्रश्न आव्हान म्हणून समोर उभे आहेत, याची ठळक नोंद असावी, यासाठी म्हणून ढेऱ्यांनी काय सोडून दिलेले आहे, याची यादी देण्याचा हा प्रयत्न आहे.
 ढेऱ्यांनी काय सोडून दिलेले आहे हा प्रश्न आणि ढेऱ्यांनी संशोधनामुळे कोणत्या विषयाच्या चर्चांची गरज जाणवते आहे हा प्रश्न हे माझ्यासाठी समानार्थक आहेत. पण ढेऱ्यांनी काय सोडून दिलेले आहे, याची तरी परिपूर्ण यादी मला करता येईल काय ? ती करता येईलसे दिसत नाही. अजून कशाकशाचा अभ्यास व्हायचा राहिलेला आहे, याची संपूर्ण यादी आपण कशी तयार करणार ? एक साधी गोष्ट प...४