पान:परिचय (Parichay).pdf/56

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

५६ । परिचय

महानुभाव संप्रदायात ब्राह्मणांची संख्या अत्यल्प आहे. पाचपन्नास ब्राह्मण घराणी महानुभाव संप्रदायात आहेत. पण प्रामुख्याने हा संप्रदाय आज ब्राह्मणेतरांचा आहे. सवर्ण ब्राह्मणेतर आणि अवर्ण दलित मिळून आज महानुभाव संप्रदायातील ९५ टक्क्यांहून अधिक अनुयायी-संख्या दिसते. तेराव्या शतकात मात्र ही परिस्थिती नाही. चांगदेव राऊळ कऱ्हाडा ब्राह्मण आहेत, गोविंदप्रभू काण्व ब्राह्मण आहेत. चक्रधर लीळाचरित्रावरून सामवेदी लाड ब्राह्मण आहेत. नामदेव महदंबिका नरेंद्र, भास्करभट्ट हे सगळे ब्राह्मण पंडितच आहेत. तेव्हा तेराव्या शतकातील महानुभाव संप्रदाय हा विद्वान ब्राह्मण पंडितांचा संप्रदाय आहे.
 आज वारकरी संप्रदायात अनुयायांच्यामध्ये ब्राह्मणेतरच भरपुर आहेत. पण नेत्यांच्यामध्ये ब्राह्मणांचे प्रभुत्व आहे. म्हणून आज हा संप्रदाय जवळजवळ ब्राह्मण नेतृत्वाखाली आहे, असे म्हणावे लागेल. पण तेराव्या शतकात परिस्थिती अशी नाही. तेराव्या शतकातील सर्व प्रमुख वारकरी सांप्रदायिक नेते ब्राह्मणेतर आहेत. विसोबा खेचर यांची जात स्वत:ला ब्राह्मण मानते. पण ब्राह्मणांनी कधी पांचाळ सोनारांना ब्राह्मण मानले नव्हते. नाही म्हणायला एक ब्राह्मण ज्ञानेश्वर दिसतो. तो वाळ पडल्यामुळे आपल्या परंपरागत जातीत मृत, जातिबहिष्कृत, पांढरीवर घर नसणारा, काळीवर शेत नसलेला, सर्व ब्राह्मणांनी वर्ज्य मानलेला पतित आहे. तेराव्या शतकातील वारकरी संप्रदायाचे रूप हे ब्राह्मणेतर संप्रदायाचे रूप आहे.
 घडायला पाहिजे ते असे की, वेदप्रामाण्य, श्रुतिप्रामाण्य आणि परंपरा मानणाऱ्या वारकरी संप्रदायात ब्राह्मण जमायला पाहिजेत. पण ते घडलेले नाही. ब्राह्मण पंडित एक तर कर्मठांच्या वैदिक परंपरेत राहिला किंवा तो महानुभाव संप्रदायात गेला. ब्राह्मणांना वारकरी संप्रदायाचे आकर्षण वाटले नाही. महानुभाव संप्रदाय कर्मकांड नाकारणारा आणि चक्रधरांच्या वाक्याला श्रुती मानणारा होता. इथे खरे तर ब्राह्मणेतर जमायला हवेत. पण तिथे ब्राह्मण पंडित जमलेले आहेत. एखाददुसरा ब्राह्मण महानुभाव संप्रदायात, एखाददुसरा ब्राह्मणेतर वारकरी संप्रदायात असता तर समाजव्यवहारातील हे अपवाद आपण मान्य केले असते. पण ज्या वेळी प्रामुख्याने वारकरी ब्राह्मणेतर आणि महानुभाव ब्राह्मण आहेत, असे चित्र दिसते, त्या वेळी वारकरी संप्रदायाचे आकर्षण बहुजनसमाजाला का वाटले, हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो.
 लोक अडाणी होते, म्हणून ते वारकरी संप्रदायाकडे गेले, हे या प्रश्नाचे खरे उत्तर नव्हते; ते सोपे उत्तर आहे. आपण ज्यांचा विजय इच्छितो, त्याच्यामागे लोक नसले, म्हणजे जनता अडाणी आहे, या सूत्राचा आपण आधार घेतो. आणि आपल्याला हवी आहे ती भूमिका जनतेने उचलून धरली, म्हणजे मात्र आपण लोकांनी उचललेली भूमिका जनतेच्या आकांक्षांची प्रतिनिधी होती, असे स्पष्टीकरण