Jump to content

पान:परिचय (Parichay).pdf/54

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

५४ । परिचय

मुळात या तीनही देवता लिंगदेवता आहेत. महादेव ही आदिवासींची लिंगदेवता आहेच. पण ऋग्वेदातील विष्णूही शिपिविष्ट आहे, म्हणून तीही गोपालन करणाऱ्या टोळ्यांची लिंगदेवताच आहे. आणि प्रजापती हा प्रजेचा उत्पत्तिकर्ता असल्यामुळे लिंगदेव आहेच. यामुळे अतिप्राचीन काळातील एक कालखंड असा आहे की, ज्या वेळी या तीनही देवता काही टोळ्यांच्या लोकदेवता होत्या; त्या वेळी त्या शिष्टांच्या देवता नव्हत्या. या तीन देवतांच्यापैकी एक विष्णू हा पुढे यज्ञस्वरूप झाला; वैदिक धर्माचा त्राता, वैदिक तत्त्वज्ञानाचा प्रवक्ता असा झाला; आणि राजा हा विष्णूचा अवतार ही भूमिका निश्चित झाली, म्हणन विष्णू हा सर्व वरिष्ठ वर्गाचा देव झाला. ब्रह्मदेव हा तर वरिष्ठ वर्गाचा देव आणि अथर्ववेदाचा उद्गाता आहेच. सर्व विद्यांची उपासना शैव परंपरेने वाढते, म्हणून राजे व पुरोहित यांचा शिव हा देव होतो. म्हणून एक कालखंड असा आहे की, ज्या वेळी शिव आणि विष्णू यांच्यापैकी एक वरिष्ठ वर्गाचा देव असतो. वरिष्ठवर्गात पुरोहित आणि राजे यांनी महत्त्व दिलेल्या बहिरंगप्रधान कर्मकांडाच्या विरुद्ध वेळोवेळी उठाव होतात. हे कर्मकांडांच्या विरुद्ध होणारे सामान्यांचे उठाव कधी शंकराच्या नावे होतात, कधी विष्णूच्या नावे होतात. अमुक देवता आदिवासींची आणि अमुक देवता वरिष्ठ वर्गाची, असे हे सरळ चित्र नाही. सगळ्याच देवता जनतेच्या आणि सगळ्याच देवता वरिष्ठ वर्गाच्या, असे हे संकीर्ण चित्र आहे.
 महाराष्ट्रात तेराव्या शतकातील साधुसंतांना वैष्णव उपासना स्वीकारावी लागते. याचा सरळ अर्थ हा की, देव-देवळे, यज्ञयाग आणि कर्मकांड या सर्व वरिष्ठ वर्गाच्या उपासनेवर शैवांचा पगडा तर होताच, पण शैव तांत्रिकांच्या आणि योग्यांच्या वामपंथीय उपासनासुद्धा समाजात सर्वत्र प्रचलित होत्या. एकीकडे बहिरंगप्रधान कर्मकांड आणि दुसरीकडे वामाचार आणि तंत्र यांच्या विरोधात संपूर्ण समाजाच्या शुद्धीकरणाचे व नैतिक पुनर्व्यवस्थापनाचे कार्य जर करायचे असेल, तर तेराव्या शतकातील संतांना शैव भूमिकेचा त्याग करणे आवश्यक होते. बहुजनसमाज चटकन जिंकण्यासाठी आणि भक्तीच्या नावे नैतिक शुद्धीकरणासाठी जर वैष्णव उपासनेचा स्वीकार तेराव्या शतकातील महाराष्ट्रीय संतांना करावासा वाटत असेल, करणे अपरिहार्य वाटत असेल, तर या घटनेची दोन कारणे अत्यंत स्पष्टपणे मान्य केली पाहिजेत : प्रथम म्हणजे शैव परंपरेत जीवनाच्या शुद्धीकरणाची अशक्यता त्या वेळच्या महाराष्ट्रात त्या वेळच्या संतांना जाणवत होती, इतका शैव मार्ग तंत्र, वामाचार व कर्मकांड यांच्याशी एकजीव झालेला होता. आणि दुसरे म्हणजे बहुजनसमाजात वैष्णव भक्तीविषयी भरपूर लोकप्रियता होती. ज्यामुळे वैष्णव उपासना जनसामान्यांना आकृष्ट करून घेण्यासाठी त्या वेळच्या संतांना उपयुक्त वाटत होत्या.