पान:परिचय (Parichay).pdf/53

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

चक्रपाणि । ५३

तुलना करून पाहावी लागणार आहे. ज्या वेळेला आपण गुरुपरंपरा पाहतो, त्या वेळेला शिष्यांच्या ग्रंथांचा गुरूच्या ग्रंथाशी असणारा अनेकपदरी संबंध तपशिलाने पाहावाच लागतो. आणि या साऱ्या, उपासनेने वारकरी असणाऱ्या संतांच्या पार्श्वभूमीत असणारा शैव परंपरांचा व्यापही पाहावाच लागतो. तेराव्या शतकातील महाराष्ट्राच्या धर्मजीवनात शैव परंपरांचे कसे व्यापक रूप आहे, हे पुष्कळच तपशिलाने ढेरे यांनी पाहिलेले आहे. पण केवळ शैव परंपरांचा व्याप पाहून या प्रश्नाचा पूर्ण उलगडा होणारा नाही.
 हे सारे शैव उपासनेच्या दृष्टीने क्रमाने वैष्णव होत आहेत. तेराव्या शतकातील महाराष्ट्रीय संतांना, ते परंपरेने शैव असूनही उपासनेने वैष्णव होण्याची आवश्यकता वाटली, ही गोष्ट आपल्याला विसरता येणार नाही. म्हणून महानुभाव संप्रदाय व वारकरी संप्रदाय यांचा अभ्यास करीत असताना वैष्णव परंपरांचासुद्धा अभ्यास करणे भाग आहे. या वैष्णव परंपरा आरंभीच्या काळात क्रमाने उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकत आलेल्या आहेत. आणि नंतरच्या काळात दक्षिणेतील प्रभावी वैष्णवांनी आपल्या वैष्णव उपासनेत सबंध उत्तरभारत गुंफून दाखविलेला आहे. इ.सनाच्या पहिल्या-दुसऱ्या शतकापासून पुढची दोन-तीनशे वर्षे वैष्णव उपासना उत्तरेतून दक्षिणेकडे येतात. त्याही महाराष्ट्राला प्रभावित करतात. आणि इ.सनाच्या दहाव्या-अकराव्या शतकापासून वैष्णव परंपरा दक्षिणेतून उत्तरेत जातात. त्याही महाराष्ट्राला प्रभावित करतातच. प्रसिद्ध वैष्णव विशिष्टाद्वैती रामानुजाचार्य ज्ञानेश्वरांच्या पूर्वीचे तर आहेतच, पण चक्रधरांच्याही पूर्वीचे आहेत. रामानुजाचार्य यांची परंपरा नाथमुनी→ पुंडरीकाक्ष→ राममिश्र→ यामुनाचार्य→ रामानुजाचार्य अशी आहे. त्यामुळे नाथमुनी हे इ.सनाच्या दहाव्या शतकातील प्रभावी वैष्णव संत मानणे भाग आहे. या तामीळ संतांचा वैष्णव मार्गात दबदबाच एवढा मोठा होता की, भक्ती दक्षिणेत जन्मली, या कल्पनेला भागवतानेच मान्यता दिली आहे. पद्मपुराणात महाराष्ट्र वैष्णव भक्तीसाठी प्रसिद्ध असल्याचा उल्लेख आलेला आहे ज्ञानेश्वरांच्या निकटपूर्ववर्ती काळात बोपदेव आणि चित्सुखाचार्य हे प्रसिद्ध वैष्णव आहेत. महानुभाव आणि वारकरी संप्रदायांवर भारतभराच्या वैष्णव परंपरांचेही संस्कार आहेतच. आणि ते नुसते उपास्य देवतेपुरते मर्यादित नाहीत.
 शैवांना वैष्णव होण्याची गरज भासली, हे सत्य आहे. अशी गरज का भासावी, हा कूट प्रश्न आहे. पण कधी तरी या कूट प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल. खरे म्हणजे या प्रश्नाचे उत्तर शिव आणि विष्णू या देवतांशी निगडित नाही; तर एकेका प्रदेशात एकेका कालखंडात असणाऱ्या परिस्थितीशी निगडित आहे. ब्रह्मा, विष्णु आणि महेश ही हिंदूंची प्रसिद्ध त्रयी आहे. या त्रयीपैकी एकही देवता यज्ञप्रधान अग्निपूजक आर्यांची मूलदेवता आहे की नाही, हे सांगता येणे कठीण आहे. कारण