पान:परिचय (Parichay).pdf/52

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

५२ । परिचय

विसोबा खेचर हा शैव तत्त्वज्ञान सांगणारा वारकरी आहे, की काही प्रमाणात वारकरी प्रभाव असलेला वीरशैव आहे, या प्रश्नाचे उत्तर देणे सोपे नाही.
 वीरशैवांची तात्त्विक भूमिका विशिष्टाद्वैती आहे, की द्वैती आहे, याबाबत पुष्कळच वादविवाद करता येईल. पण ती अद्वैती भूमिका नाही. वारकऱ्यांची भूमिका शांकर अद्वैताची भूमिका आहे, की काश्मीरी परंपरेच्या शैव अद्वैताची भूमिका आहे, यावरही पुष्कळ वाद करता येईल. पण वारकरी हे विशिष्टाद्वैती नाहीत किंवा द्वैतीही नाहीत. तत्त्वज्ञान म्हणून विसोबांचा ग्रंथ नेमका कोणत्या परंपरेत बसतो, याचे उत्तर तपशिलाने अभ्यास करून द्यावे लागेल. वरवरच्या स्थूल पाहणीत माझे मत असे बनलेले आहे की, हा ग्रंथ वारकऱ्यांच्या अद्वैत परंपरेतला ग्रंथ आहे. पण याही चर्चेचा तपशील यांनी पुढच्या संशोधनासाठी सोडून दिलेला आहे.
 ज्ञानेश्वर परंपरेने शैव आहेत. विसोबा खेचर, चांगदेव, मुकुंदराज, त्यांचे परम गुरू हरिनाथ हेही शैव आहेत. नामदेव शैव आहेत काय, हा वादाचा प्रश्न आहे. पृष्ठ ५२ वर ढेरे नोंदवतात : नामदेव हे शैव आहेत. हा मुद्दा इतक्या सहजासहजी सिद्ध होणार नाही. त्याची तपशिलाने मांडणी करावी लागेल. नामदेवांच्या गाण्यात श्रीपर्वताचे उल्लेख आलेले आहेत. मल्लिकार्जुनाचा उल्लेख आहे. शिवमार्ग पाहिल्याचा उल्लेख आहे. हे तीनही उल्लेख ढेरे यांनी पृष्ठ १०८ वर नोंदवलेले आहेत. पण यांखेरीज नामदेव शैव असल्याचे अनेक उल्लेख दाखवता येतात. माझा जन्म शिंप्याच्या कुळात झाला, पण माझे मन सदाशिवात गुंतलेले होते; सूई, कात्री, गज आणि दोरा हा सर्व पसारा मांडलेला असतानाही मी सदाशिवातच गुंतलेलो होतो; असे नामदेवच आपल्या गाथ्यात सांगतात. म्हणून नामदेव परंपरेने शैव असणे अशक्य नाही. पण तशी प्रसिद्धी नाही. प्रसिद्धी अशी आहे की, नामदेवांच्या घराण्यात परंपरेने वैष्णव उपासना चालू होती आणि नामदेव लहानपणापासून केशवराजाचे भक्त होते. नामदेव मूलतः वैष्णवच होते, असा आग्रह धरण्याचे मला कारण दिसत नाही. पण ते शैव होते, हा मुद्दा अधिक तपशिलाने चर्चा करून सिद्ध करावयाचा आहे. तो गृहीत धरावयाचा मुद्दा नाही.
 वारकरी संप्रदायातील हे मोठमोठे आचार्य आपल्या परंपरेने शैव दिसतात. यांच्या वाङमयाची आपापसात तुलना करून अभ्यास करणे ही एक आवश्यक गोष्ट आहे. चांगदेव हे जर विसोबा खेचरांचे परम गुरू असे म्हटले, तर 'तत्त्वसार' आणि 'षटस्थल' या दोन ग्रथांचा गाढ आंतरिक संबंध दाखवता आला पाहिजे हे दोन्ही ग्रंथ वारकरी संप्रदायात आल्यानंतरचे असणार; कारण 'तत्त्वसार' ग्रंथ ज्ञानेश्वरी नंतरचा आहे. त्यानंतरचा 'षट्स्थल' गृहीत धरावा लागतो. एकीकडे नाथपरंपरेतील 'विवेकदर्पणा'शी आणि दुसरीकडे ज्ञानेश्वरीशी 'षट्स्थल' आणि 'तत्त्वसार' यांची