पान:परिचय (Parichay).pdf/51

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

चक्रपाणि । ५१

असतो, त्याला स्वतंत्र ग्रंथ असे म्हणतात. ज्ञानेश्वरी ही गीतेवरील टीका म्हणायची. जुन्या परंपरागत अर्थाने तो गीतेचा अनुवादही आहे. अमृतानुभवातील विवचनाला आधार असणारच, पण त्याला स्वतंत्र ग्रंथ म्हणायचे. कारण कोणाचाही आधार न घेता सर्वस्वी स्वतंत्र असे तत्त्वज्ञानविवेचन नसते. विसोबांचा ग्रंथ इतर कोण्या ग्रंथाचा अनुवाद दिसत नाही. कारण अशा वेळी मूळ ग्रंथकाराला नमन असते. ते इथे नाही. १५८ व्या ओवीत 'अनुवाद करीन' असा उल्लेख आहे. पण हा अनुवाद 'वटेश्वरप्रसादे' म्हणजे गुरुप्रसादे व्हायचा आहे. पार्वतीने शंकराला प्रश्न केला त्याचे जे शंकराने उत्तर दिले ते परंपरेने गुरुकृपेमुळे विसोबाला प्राप्त झालेले आहे. त्याचा तो अनुवाद करणार आहे. याचा इतर ग्रंथांशी काही संबंध नाही. म्हणून 'षट्स्थल' हा ग्रंथ स्वतंत्र ग्रंथ म्हणूनच पाहायला पाहिजे.
 सर्वसामान्यपणे वीरशैव संप्रदाय वेदप्रामाण्य अमान्य करणारा संप्रदाय आहे. परतु विसोबांनी शारदेचे नमन करीत असताना तिला वेदमाता म्हटले आहे. सर्व पुराणे तिचे मोठेपण सांगतात, असे म्हटले आहे (ओवी ३१). पूढेही वेदांचा उल्लेख ओवी १३६ या ठिकाणी आला आहे. यजुर्वेदाचा उल्लेख ओवी ४४५ मध्ये आला आहे. यावरून स्वत: विसोबा खेचर आपल्याला ज्ञानेश्वरांप्रमाणे वेदमार्गानुयायी मानतात, ही गोष्ट उघड आहे. ज्ञानेश्वरांप्रमाणेच त्यांनी गणपतीला ब्रह्मस्वरूप म्हणून नमन केलेले आहे. हा गणपती मुक्तिदायक असून शैवांच्या कैलासाकडे बोट दाखविण्याऐवजी वैकुंठवाट दाखवणारा आहे ( ओवी १८ ). विसोबा शारदेलाही परब्रह्मस्वरूपच मानतात. ती ब्रह्मात्मक, चैतन्यरूप, शून्यातीत आणि परब्रह्माची अधिष्ठान अशी आहे. या शारदेला ते मुक्ताई म्हणतात (ओवी ५४). पुढे त्यांनी सद्गुरूला नमन केलेले आहे. हा सदगुरूसुद्धा सहज परब्रह्म, आकार आणि निराकार यांच्या पलीकडचा परात्पर असुन या सद्गुरूच्या दर्शनाने ज्ञानसिद्धी होते. तो स्वतःच परमपुरुष आहे. विसोबांनी माया हेच अज्ञान, तीच अविद्या, याचाही उल्लेख करून हे अज्ञान म्हणजे बंधन, असे मत दिले आहे (ओवी १४५). पुढे चालून विष्णूचेही आदराने उल्लेख आलेले आहेत. वैष्णव गोपाळ भक्तजनांचाही उल्लेख ४१७ व्या ओवीत आहे. जे ज्ञानरहित भक्ती करतात त्यांना मुक्ती मिळत नाही, असाही उल्लेख आहे (ओवी ५१६). ब्रह्म हे निर्गुण, निराकार आहे आणि ते परिपूर्ण घन आहे, असा उल्लेख ओवी ६३८ मध्ये आहे. हे सर्व उल्लेख जर काळजीपूर्वक पाहिले, तर आपल्याला असे मत द्यावे लागते की, 'षट्स्थल' हा ग्रंथ विसोबांनी वारकरी संप्रदायात प्रवेश केल्यानंतर लिहिलेला आहे. शिव आणि विष्णू यांत अभेद मानणाऱ्या एका वारकऱ्याने शैवागम सांगितला आहे, असे या ग्रंथाचे स्वरूप आहे. वारकरी संप्रदायाच्या भूमिकेने प्रभावित झालेल्या एका वीरशैवाचे हे लिखाण आहे, असेही म्हणता येईल. ग्रंथकार