पान:परिचय (Parichay).pdf/48

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

४८ । परिचय

कालीन पुरावा सुधारून घेण्यासाठी उत्तरकालीन पुराव्याचा वापर करण्यात आलेला आहे. समाजशास्त्रीय अभ्यासाची ही एक महत्त्वाची आणि अपरिहार्य ठरणारी अशी पद्धत आहे. शुद्ध ऐतिहासिक पद्धतीपेक्षा या पद्धतीचे निराळेपण आपण समजून घेतले पाहिजे आणि या पद्धतीच्या वापराची अपरिहार्यताही समजून घेतली पाहिजे. ढेरे यांच्या प्रबंधात ऐतिहासिक पद्धत आणि समाजशास्त्रीय पद्धत या दोन्हींचाही मोठया सामर्थ्याने आणि सावधपणे वापर करण्यात आलेला आहे. सांस्कृतिक इतिहासाच्या अभ्यासात पुरावा देण्याची ही पद्धत टाळता येणे अशक्यच असते.
 ढेरे हे मराठी वाङमयातील आपल्या वर्गात आपणच बसणारे असे संशोधक आहेत. त्यांच्याप्रमाणेच त्यांचा प्रबंधही आहे. ढेरे यांचा हा प्रबंध मराठीतील डॉक्टरेटच्या प्रबंधांत अगदी निराळ्या प्रकारचा आणि आपले वेगळेपण निर्माण करणारा प्रबंध आहे. असे प्रबंध वारंवार येत नसतात. अशा प्रकारचे ग्रंथ परीक्षांचे प्रबंध म्हणून सादर करण्याचा योगही अतिशय दुर्मीळ असतो. मुळात डॉक्टरेटसाठी सादर करताना या प्रबंधाचे नाव 'षट्स्थल : एक अध्ययन ' असे होते. आणि मूळ ग्रंथाच्या सोबत परिशिष्ट म्हणून 'षट्स्थल ' ग्रंथाची सर्व संहिता सादर केली होती. डॉक्टरेटचा हा प्रबंध ग्रंथरूपाने प्रकाशित होत असताना संहिता विभाग यातून बाजूला काढलेला आहे. कारण 'षट्स्थल ' या ग्रंथाची संहिता सटीप छापणे आणि त्यासह हस्तलिखिताची व ग्रंथप्रामाण्याची सविस्तर चर्चा स्वतंत्रपणे करणे हे जास्त सोयीचे जाणार आहे. विसोबा खेचरांचा 'षट्स्थल' हा ग्रंथ ढेरे यांना प्रथमच उपलब्ध झालेला आहे. अशा वेळी हा ग्रंथ तेराव्या शतकातील आहे आणि विसोबांचाच आहे, या दोन्ही मुद्दयांची तपशिलाने चर्चा करणे अपरिहार्य ठरणार आहे. म्हणून संहिता गाळून उरलेला ढेरे यांचा प्रबंध ' चक्रपाणि' या सुटसुटीत नावाने प्रकाशित होत आहे. तेराव्या शतकातील एखादा ग्रंथ नव्यानेच उपलब्ध होणे हाही योग दुर्मीळ आहे आणि अशा ग्रंथाचा प्रबंधासाठी आधार घेणे हे तर अधिकच दुर्मीळ आहे. अलीकडच्या काळात, पूर्वी गोरक्ष-अमर-संवाद म्हणून ओळखला जाणारा पण खरोखरी ' विवेकदर्पण' हे नाव असणारा संपूर्ण ग्रंथ उपलब्ध झालेला आहे. ढेरे यांना सापडलेला 'षट्स्थल' हा ग्रंथ आणि 'विवेकदर्पण' हा ग्रंथ दोन्ही डॉक्टरेटच्या प्रबंधाचे विषय होऊ शकतील इतके मूल्यवान ग्रंथ आहेत. मात्र ज्या वेळी अभ्यासाचा विषय आपण लहानसा घेतो, त्या वेळी अधिक खोलात उतरण्याची तयारी ठेवली पाहिजे.
 ढेरे यांना 'षट्स्थल' ग्रंथ उपलब्ध झालेला असला, तरी तो संपूर्ण ग्रंथ या प्रबंधात सर्व बाजूंनी अभ्यासिला गेलेला आहे, असे नाही. त्या ग्रंथात गुरुपरंपराविषयक जे उल्लेख आलेले आहेत, त्यांना आरंभ गृहीत धरून ढेरे यांनी केलेले चिंतन हा या प्रबंधाचा विषय आहे. एका नव्यानेच उपलब्ध झालेल्या ग्रंथात