पान:परिचय (Parichay).pdf/49

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

चक्रपाणि । ४९

नोंदवलेली गुरुपरंपरा आणि या गुरुपरंपरेचे चिंतन करीत असताना उपलब्ध होणारी अनेक ऐतिहासिक तथ्ये इतकाच ढेरे यांच्या प्रबंधाचा विषय आहे. 'षट्स्थल' ग्रंथातील सामग्रीचा अभ्यास इतक्यावर संपणार नाही. शैवपरंपरांच्या सर्व तात्त्विक वाङ्मयात एक तत्त्वज्ञानग्रंथ म्हणून विसोबांचा ग्रंथ पाहणे आणि तत्त्वज्ञानग्रंथ म्हणून या ग्रंथाचे मूल्यमापन करणे, विवरण करणे हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. ढेरे यांनी ती बाजू विस्ताराने विचारात घेतलेली नाही. शैवागमांत सुद्धा आग्रही वेदप्रामाण्यवादी आणि श्रुती म्हणून शैवागमांतील इतर ग्रंथांचा उल्लेख करून वेदांच्या महत्त्वाकडे दुर्लक्ष करणारे असे दोन प्रवाह आहेत. वीरशैव संप्रदाय वेदप्रामाण्यवादी म्हणून ओळखला जाणारा संप्रदाय नव्हे. पण जे वेदप्रामाण्यवादी नाहीत त्यांचे सगळेच्या सगळे तत्त्वज्ञान वेदप्रामाण्यवादी शैव कसे स्वीकारतात, हाही एक अभ्यास करण्याजोगा विषय आहे. 'षट्स्थल' हा याही दृष्टीने महत्त्वाचा ग्रंथ ठरेल, असे मला वाटते. ढेरे यांनी आपला विषय एका मर्यादेत आखून घेतलेला आहे. ते आपल्या ठरविलेल्या भूमिकेपासून दूर फारसे इकडेतिकडे जात नाहीत. याचा अर्थ हा की, एका संदर्भात ढेरे यांनी 'षट्स्थला'चा विचार केलेला आहे. पण इतर अनेक दिशा अजून तपासावयाच्या राहिलेल्या आहेत.
 कोणत्याही अर्थाने ढेरे यांचे हे विवेचन सर्वांगीण आणि संपूर्ण नाही. क्रमाने सांगायचे, तर 'षट्स्थल' हे या ग्रंथाचे नाव नाही. मूळ ग्रंथभर आलेले नाव 'शडूस्छळी' असे आहे. 'षट्स्थल ' हे मराठी ग्रंथात उपलब्ध असणान्या नावाचे संस्कृत रूप आहे. बहुतेक ढेरे यांचा हा तर्क असावा की, मूळ ग्रंथकाराने 'षट्स्थल' असाच शब्दप्रयोग केलेला आहे. प्रतकाराच्या अशुद्धपणामुळे असे रूप प्राप्त झालेले आहे. वीरशैवांच्या वाङ्मयात 'षट्स्थल' असाच शब्दप्रयोग आढळतो. मला स्वतःला ही भूमिका मान्य नाही. शुद्ध रूप आणि अशुद्ध रूप ही चर्चा शब्दांच्या संदर्भात करीत असताना अतिशय सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. मराठी भाषेतील शब्द फार मोठ्या प्रमाणात संस्कृत →महाराष्ट्री प्राकृत →महाराष्ट्रीचा अपभ्रंश (जो जैन महाराष्ट्री अपभ्रंश या नावाने प्रसिद्ध आहे) →आणि मराठी या क्रमाने येतात. म्हणून मराठीत हे शब्द येताना त्यांचे रूप पानीयम् या संस्कृत रूपाशी मिळतेजुळते म्हणजे पानी हेच शुद्ध असेल असे नाही. ते प्राकृताच्या अनुबंधाने पाणी असे होते, व तसेच ते शिष्ट मराठीत स्वीकारले जाते. एकीकडे ही प्रक्रिया चालू असताना दुसरीकडे मराठीत पुन्हा एकदा संस्कृत शब्द वापरण्याची आणि भाषेचे संस्कृतीकरण करण्याची प्रक्रियाही चालू असते. म्हणून हात हा शब्द भाषेत असतानाच पुन्हा हस्त हा शब्दही वापरला जातो. तेराव्या शतकातील मराठी एका विशिष्ट सांध्यावरची मराठी आहे. ज्या प्राकृताशी या मराठीचा