चक्रपाणि । ४७
पाहिजे. त्यांची पद्धत शुद्ध ऐतिहासिक संशोधनाची पद्धत नाही आणि ज्या क्षेत्रात ढेरे संशोधन करीत आहेत, त्या क्षेत्रात शुद्ध ऐतिहासिक पद्धत एका मर्यादेपलीकडे उपयोगी पडण्याचा संभवही नाही. संशोधनाच्या शुद्ध पद्धतीत समकालीन पुराव्याला सर्वांत अधिक महत्त्व असते.आणि असा समकालीन पुरावा जर सापडला नाही, तर जो कोणता पुरावा उपलब्ध होईल, त्यातील तुलनेने पूर्वकालीन असणाऱ्या पुराव्याला जास्त महत्त्व असते. छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदासस्वामी यांच्या संबंधाविषयी उत्तरकालीन पुरावा खूप बोलतो, पण शिवाजी महाराजांना समकालीन असणारा पुरावा या गुरुशिष्यसंबंधाविषयी फारसे बोलत नाही. म्हणून उत्तरकालीन पुरावा अप्रमाण मानणे भाग असते. पुरावे देण्याची आणि त्यावरून निर्णय घेण्याची ही ऐतिहासिक अभ्यासकांची सर्वमान्य प्रथा आहे. सर्वच संशोधकांना ही ऐतिहासिक प्रथा मान्य करावीच लागते. पण सांस्कृतिक इतिहासाच्या क्षेत्रात या पद्धतीच्या पलीकडे जाणे भाग असते. समाजशास्त्रीय अभ्यास करणारी मंडळी याहून निराळया पद्धतीने जातात. ते आपल्यासमोर उपलब्ध असलेला पुरावा नोंदवतात आणि त्या आधारे पूर्वकालाविषयी निर्णय घेतात. हा निर्णय घेताना समोर जो पुरावा दिसतो आहे, त्याला पूर्वकालीन असणारा पुरावा पुष्कळदा बाद करावा लागतो. म्हणजे या ठिकाणी उत्तरकालीन पुराव्याच्या आधारे कित्येकदा पूर्वकालीन पुरावा बाद ठरवावा लागतो. याचे उत्तम उदाहरण दसऱ्याचा सण हे आहे. या विजयादशमीच्या दिवशी प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केला, म्हणून हा सण अस्तित्वात आला, याची नोंद इ. सनाच्या दहाव्या शतकाच्या नंतरच्या भारतभरच्या वाङमयात अनेकदा झालेली आढळून येते. अशाच प्रकारची नोंद पांडवांनी शमी वृक्षावर ठेवलेली शस्त्रे या दिवशी काढून घेतली असावी, ही आहे. पण वर्तमानकाळात या सणात असणारे वृक्षपूजा, अश्वपूजा आणि शस्त्रपूजा यांचे महत्त्व नोंदवून समाजशास्त्रज्ञांना ही नोंद घ्यावी लागते की, हा सण वेगवेगळया परंपरांतून बनलेला आहे. या परंपरांच्या मध्ये एक धागा शकांची शस्त्रपूजा व अश्वपूजा आहे. दुसरा धागा आदिम समाजातील वृक्षपूजा आहे. याला जोडूनच मागे देवीचे नवरात्र आहे. त्यात नव्या धान्यांना महत्त्व आहे. यामुळे एक धागा शेतीच्या देवतेच्या पूजेचाही आहे. प्रतिष्ठित असणाऱ्या या सणाला रामायण-महाभारतातील कथा नंतर चिकटलेल्या आहेत.
म्हणजे आपण या ठिकाणी नेमके काय केले? विसाव्या शतकात उपलब्ध असणारा पुरावा मागच्या पाच-सातशे वर्षांतील अवशिष्ट राहिलेल्या वाङमयीन पुराव्याला बाजूला सारणारा आहे हा निर्णय घेऊन, त्याही आधीच्या काळातील वास्तवाचा द्योतक हा वर्तमानकालीन पुरावा ठरविलेला आहे. समाजशास्त्रीय अभ्यासाला ही पद्धत स्वीकारणे भाग आहे. ढेरे यांच्या विवेचनात जागोजाग पूर्व-