पान:परिचय (Parichay).pdf/46

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

४६ । परिचय

परंपरांचे वाङमयावर जे प्रभाव असतात त्यापेक्षा किती तरी महत्त्वाचे असणारे धार्मिक परंपरांचे वाङमयावरील संस्कार हा त्यांच्या न संपणाऱ्या जिज्ञासेचा विषय आहे. आणि म्हणून ढेरे यांचे वाङमयेतिहाससंशोधन नेहमीच सांस्कृतिक इतिहासाच्या संशोधनाचा भाग बनत आलेले आहे. प्रायः आमचे वाङमयेतिहाससंशोधक सांस्कृतिक इतिहासाच्या बाबत फारसे खोलात शिरत नाहीत. ढेरे हे याला अपवाद आहेत. सरळ सरळ त्यांच्या लिखाणाला आता अनेकपदरी, व्यापक व गुंतागुंतीचे स्वरूप येऊ लागलेले आहे. अप्रकाशित वाङमय प्रकाशित करणे, या वाङमयाचा वाङमयीन व वैचारिक आढावा घेणे हे कार्य तर त्यांचे चालू असतेच; पण या वाङमयाचा सांस्कृतिक संदर्भ शोधीत राहणे, त्या दष्टीने इतर सामग्रीचा संदर्भ जोडणे हेही कार्य चालू असते. या दोन दिशा वाङमयाचा अभ्यास करताना निर्माण होतात. पण त्याबरोबर अजून एक तिसरी दिशाही आहे. ढेरे लोकसंस्कृतीचे एक जिज्ञासू अभ्यासक आहेत. या लोकसंस्कृतीच्या अभ्यासात क्रमाने वर्तमानकाळात उपलब्ध असणारा पुरावा नोंदवून या पुराव्याचा इतिहासकाळात उलगडा करावा लागतो. याही मार्गाने ढेरे यांचे विवेचन चालू असते.
 आमच्या वाङमयेतिहासाचे स्वरूप मोठया प्रमाणात वैदिक धर्माभिमानी, हिंदुधर्माभिमानी अशा अभ्यासकांनी केलेल्या अभ्यासाचे आहे. यामुळे ज्ञानेश्वरांचा अभ्यास सुरू झाला, म्हणजे लगेच आपण त्यांचा शंकराचार्यांशी काय संबंध आहे, हे शोधून पाहू लागतो. तेराव्या शतकातील ज्ञानेश्वरांचा संबंध ते नाथसांप्रदायिक असल्यामुळे अभिनवगुप्ताशी अधिक निकटचा असेल, हे आम्हाला जाणवतच नाही. भारतीय जीवनात वैदिकांच्या खेरीज जैन व महानुभाव आहेत. महाराष्ट्राच्या दक्षिणेला कर्नाटकात वीरशैव संप्रदाय आहे आणि उत्तरेत गुजरातेत इतर वैष्णवांच्या परंपरा आहेत, याचेही फारसे भान आपल्याला नसते. तेराव्या शतकातील महाराष्ट्र समकालीन आणि लगतच्या पूर्वकालातील भारतीय धार्मिक वातावरणाशी संलग्न असणार आणि मराठी भाषाही भाषा म्हणून अपभ्रंशाशी निकट असल्यामुळे अपभ्रंशातील वाङमयपरंपरा व विचारपरंपरा यांचा मराठी वाङमयाशी संबंध असणार, हे आपण नजरेआडच केलेले आहे. ढेरे यांचे वैशिष्ट्य असे की, त्यांच्या मनाने या सर्व व्यापाचा अंदाज घेतलेला आहे. जैन वाङमय, वीरशैव वाङमय, शैवांचे अनेकानेक संप्रदाय यांचा मराठी वाङमयाशी असणारा आंतरिक घनिष्ठ संबंध ते शोधून पाहत आहेत. अभिनिवेश नसणारा आणि आकलनाचे व जाणिवांचे क्षेत्र अनेकपदरी व व्यापक असणारा एक संशोधक या लिखाणामुळे आपल्याला उपलब्ध होत आहे. खरे तर यामुळे संशोधनाच्या आणि अभ्यासाच्या नवनव्या दिशा उजेडात येत आहेत. कुणीही झाले तरी ही बाब समाधानाची आहे, असेच मानील.
 ढेरे यांच्या विवेचनपद्धतीविषयी एक वैशिष्टयपूर्ण बाब इथेच नोंदवून ठेवली