पान:परिचय (Parichay).pdf/37

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महानुभाव वाङमयाचे संशोधन । ३७
 

चार वर्षे अनुसरण म्हणजे शके ११९० ला. अनुसरणाच्या वेळी नागदेवांचे वय ३२ वर्षांचे म्हणजे त्यांचा जन्म शके ११६२ चा. संप्रदायाला मान्य असणारीगणना हीच राहणार. इतिहासाच्या अभ्यासकाला हे पटो अगर न पटो. कारण ही कालगणना बदलायची म्हणजे स्मृती बदलायची. स्मृती बदलण्यासाठी धर्ममान्य कारण आपण कोणते देणार?
 ऐतिहासिकांनी हा काळ सतत पुढे ढकलला आहे. प्रथम त्यांनी शके १२२४ च्या ऐवजी १२२८ हा काळ दिला. चक्रधरांचे प्रयाण ११९८ मानले की पुढे तीस वर्षे जाऊन हा काळ येतो. तुळपुळे ह्यांना हा काळ शके १२३० वाटतो. पारख ह्यांनी तो शके १२३५ ठरविला. मला स्वत:ला हा काळ शके १२४० च्या जवळ जाणारा असा वाटतो. खरा महत्त्वाचा प्रश्न नागदेवाचार्यांचा निधनकाल निश्चित कसा करावा हा आहे. स्मृती क्र. ८७ प्रमाणे राज्यांतराच्या वेळी नागदेवाचार्य यात होते. त्यानंतर ते वारले. हे राज्यांतर इ. स. १३१३ चे. म्हणजे शके १२३५ चे आहे. म्हणून पारेख हा काळ शके १२३५ देतात.
 प्रत्यक्ष स्मृती क्र. ८७ असे सांगते की, राज्यांतर झाल्यानंतर सगळीकडे निर्भय झाल्यानंतर काही काळाने (केतुलीया काळा) भटोबास निंबे ह्या ठिकाणी आले व तिथे राहू लागले. ह्यानंतर बऱ्याच काळाने ते वारलेले दिसतात. स्मृती २०५ मध्ये 'निंबेया पुनर्वास' आहे. स्मृती क्र. ८५ च्या नंतरचा काळ दिसतो. म्हणन मी नागदेवाचार्यांचे निधन राज्यांतरानंतर काही वर्षे पुढे गृहीत धरणे रास्त मानतो. म्हणजेच शके १२४० च्या जवळ नेऊ इच्छितो. पण तूर्त आपण पारखी ह्यांचा काळ मान्य करून विचार करू. ह्या काळाला अनुसरून जर आपण चक्रधरांचे प्रयाण शके ११९४ मानले तर त्या वेळी नागदेव २५ वर्षांचे ठरतात. जर हे प्रयाण शके ११९६ असेल तर नागदेव २७ वर्षांचे व शके ११९८ प्रयाण मानले तर नागदेव २९ वर्षांचे ठरतात. ह्यापूर्वी चार वर्षे अनुसरण, म्हणजे अनुसरणाच्या वेळी नागदेव कमीत कमी २१ वर्षांचे व जास्तीत जास्त २५ वर्षांचे असणार म्हणन ३२ व्या वर्षी अनुसरण हा पक्ष बाधित मानणे भाग आहे. ह्या गणितात निधनसमयी भटोबासांचे वय ६६ गृहीत धरले आहे. त्यानुसार त्यांचा जन्म शके ११७१ चा येणार व धर्मप्रचाराचे कार्य २५ वर्षांचे मानावे लागणार. स्मृती २६० मधील सर्वच माहिती ह्यानुसार बदलून घ्यावी लागेल. अगर स्मृती ८७ तील माहिती बदलून राज्यांतराच्या वेळी नागदेव हयात नव्हते असे म्हणावे लागेल. पण मग अनेक स्मृतींतील अनेक माहिती बाद समजावी लागेल.
 नागदेवाचार्यांचा काळ बदलला म्हणजे वाईदेववासाचा काळ बदलतो. त्यानुसार शिशुपालवध, उद्धवगीता, वछाहरण इ. चे काळ बदलतात. शक्यता ही आहे की, भास्करभटाचे ग्रंथ शके १२४० नंतरचे असतील; राज्यांतर व निर्भय