पान:परिचय (Parichay).pdf/36

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
३६ । परिचय
 

 कोलते, वा. ना. देशपांडे ही पिढी आता अस्तंगत होत आहे. ह्या पिढीचे कार्य सदैव आदरणीय, वंदनीय राहणार आहे, ह्यात वाद नाही. पण चिकित्सेचा प्रांत इथे थांबणारा नाही. चिकित्सा नव्या युगात प्रवेश करीत आहे. ह्या नव्या पातळीवरील चिकित्सेचे एक रूप म्हणून आमचे मित्र डॉ. ढेरे ह्यांच्याकडे पाहिले पाहिजे. महानुभाव महंत व सांप्रदायिक ह्यांना आता क्षेपप्रक्षेपांच्या चर्चा व कालनिश्चितीच्या चर्चा ह्यांची सवय झालेली आहे. महानुभाव साहित्य प्रकाशात यावे म्हणून स्वेच्छेने स्वतःवर बंधने लादून घेण्याची गरज आता अभ्यासकांना उरलेली आहे, असे नव्या संशोधकांना वाटत नाही. एखादा धर्मसंप्रदायाची निंदानालस्ती करणाऱ्याविरुद्ध दृढपणे, खंबीरपणे उभे राहणे निराळी गोष्ट आहे आणि अनिर्बंध पण पुरावेशुद्ध संशोधनानेही श्रद्धेला तडाच जाणार असतो, पण दोन पातळीत फरक आहे, हे सर्वांनीच समजून घेण्याची आता गरज आहे. ख्रिश्चनांनीच त्यांच्या वाङमयाची सर्वांगीण कठोर चिकित्सा केलेली आहे. आज वैदिकांच्या वाङमयाची कठोर चिकित्सा करणारे वैदिकच आहेत. महानुभाव पंथात ही वेळ येणार आहेच. संशोधक फक्त पुराव्याच्या आधारे सत्याचा शोध घेत असतात. या वाटेने जाताना इतर कोणती संपदा उद्ध्वस्त, उजाड होईल याची चिंता संशोधकांना नसते. हया संशोधकांवर रागावण्यात अर्थ नसतो.
 हया नव्या युगात प्रवेश करताना महानुभाव अभ्यासकांना दोन भिन्न पातळीवर काम करण्यास व विवेचनाची मांडणी करण्यास सिद्ध झाले पाहिजे. एखाद्या प्रश्नासंबंधी संप्रदायाचे म्हणणे काय आहे हया बाबतीतही दक्ष असावे लागेल आणि हया प्रश्नासंबंधी चिकित्सकांचे म्हणणे काय आहे याचाही विचार करावा लागेल. सगळ्याच धर्मसंप्रदायाला हे म्हणणे लागू असते. वेद अपौरुषेय व अनादि आहेत असे वैदिक धर्माचे मत आहे. याचीही नोंद घेणं भाग आहे. वेद हे माणसांनी रचलेल्या सूक्तांचे संग्रह आहेत. ही रचना इ. स. पू. २००० ची असली तरी अनादि नव्हे. जगाच्या उत्पत्तीच्या मानाने वेद फार अलीकडचे आहेत, असे ऐतिहासिक चिकित्सकांचे मत आहे. याची नोंदही टळत नसते. क्रमाने हया चिकित्सा परंपरागत श्रद्धांच्यावर मात करतात, असा नव्या जगाचा अनुभव आहे.
 चिकित्सेच्या दिशा अनंत असतात. वर गभितार्थाचा मुद्दा आलेला आहेच. त्याला अनुसरून आपण उदाहरण म्हणून नागदेवाचार्यांचा विचार करू. भटोबास तथा नागदेवाचार्य हे महानुभाव संप्रदायाचे पहिले आचार्य. स्मृतिस्थळाप्रमाणे नाग देवाचार्यांचे आयुष्य ६६ वर्षांचे. त्यांचे निधन शके १२२४ ला झाले. हया आयुष्यापैकी चौदा वर्षे गोविंदप्रभूच्या सेवेत व सोळा वर्षे पंथप्रचारात अशी तीस वर्षे मोजून आपण मागे गेलो तर 'सर्वज्ञांचे' उत्तरापंथे प्रयाण शके ११९४. हयापूर्वी