पान:परिचय (Parichay).pdf/38

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
३८ । परिचय
 

झाल्यानंतर जर नागदेव वारले असतील, तर मग संप्रदायाला कोकणात जाण्यासाठी कारण उरत नाही. 'खालसेयाची धाडी' आली तेव्हा भास्करभट आचार्य असतील तर मग अनेक अनुबंध बदलतील. आणि 'निर्भय' होईपर्यंत नागदेवाचार्य हयात असतील तर मग ग्रंथलोपाची सर्व कहाणीच क्षेपक मानावी लागेल. स्मृतिस्थळातील कथांना व स्मृतींना कालानुक्रम नाही हे यापूर्वी अनेकांनी दाखविलेले आहे. अनेक महत्त्वाच्या अज्ञात स्मृती आहेत. त्याखेरीज स्मृतिसमुच्चयात काही स्मृती आहेत. व त्यात क्षेपक भाग असण्याचा संभव पुष्कळ आहे. त्यातील माहितीही क्षेपक असण्याचा संभव आहे. स्मृतिस्थळावर अंतिम हात शके १३५२ च्या सुमारास फिरला हे मान्य केले तर मूळ घटना घडून गेल्यानंतर पाऊणशेहन अधिक वर्षे श्रद्धेची सामग्री येथे प्रविष्ट होते आहे असे दिसते.
 नागदेवाचा काळ अपरिहार्यपणे महदाइसेच्या काळावर प्रकाश टाकीत असतो. नागदेवाचार्य व महदाइसा ही चुलत भावंडे. नागदेव व त्याचे भाऊ ह्यांच्या मुंजी झाल्यानंतर लहानपणीच त्यांचे विवाह झाले. ह्याच सुमारास उमाइसा व महदाइसा यांचे विवाह झाले. ह्या विवाहाच्या वेळी नागदेवाचार्य लहान होते. म्हणजे त्यांचे वय १०-१२ वर्षांचे असावे आणि उमाईसा ही नागदेवाची धाकटी बहीण किमान ३ वर्षांनी तरी त्यांना लहान असणार. म्हणून महदाइसा सुमारे ८-९ वर्षांची ह्या वेळी असणार. महदाइसा नागदेवाचार्यांना निदान दोन वर्षांनी तरी धाकटी मानणे भाग आहे. कारण त्या वेळी लहान वयातच मुलींची लग्ने होऊन जात. परंपरेनुसार नागदेवाचार्य शके ११६२ ला जन्मले. हे गणित मनात ठेवूनच वा. ना. देशपांडे महदाइसेचा जन्म शके ११६४ सांगतात. काही जण सोयिस्करपणे पुष्कळदा काळाचे उल्लेख करतात. डॉ. तुळपुळे ह्यांनी महदाइसेचा काळ अंदाजाने शके ११५० ते १२२५ असा ठरविला आहे. हा काळ खरा मानायचा तर रूप ही नागदेवाला १२ वर्षांनी वडील मानली पाहिजे व तिचे लग्न नागदेवाच्या जन्मापूर्वी व्हायला हवे. पारखे ह्यांच्या गणनेनुसार नागदेवाचा जन्म शके १२७१ चा मानला तर महदाइसा शके १२७३ च्या सुमारास जन्मली, असे मानावे लागेल. चक्रधरस्वामींच्या प्रयाणसमयी महदाइसेचे वय २५ च्या आसपास फार तर येईल. वय वर्षे २० ते २५ महदाइसा स्वामींच्या सहवासात होती असे मानावे लागेल. चक्रधरांच्या तोंडी नेहमी 'म्हातारी ' असा उल्लेख येतो. या म्हातारीचा वयाशी संबंध नसून त्या शब्दाचा अर्थ स्त्री इतकाच घेणे भाग आहे. ह्याला अनुसरून स्वामींच्या परिवारातील अनेकांची वये गृहीत धरावी लागतील. एरव्ही नागदेवाने ज्यांना तरुण म्हणावे त्यांना पुढच्या चार-दोन वर्षांत चक्रधरांनी म्हाताऱ्या म्हणावे ह्याची संगती लागत नाही.
 महदाइसेचा उल्लेख निघालाच आहे तर हयाच ठिकाणी अजून काही